तिलक-सूर्यकुमारवर टीम इंडियाची जबाबदारी; आज सुपर एट फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर एट फेरीत हिंदुस्थानी संघासमोर दक्षिण आफ्रिका हे स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात कठीण आव्हान असणार आहे. गट फेरीत चारही सामने जिंकून आत्मविश्वासाच्या शिखरावर असलेल्या हिंदुस्थानी संघाची खरी कसोटी आता सुरू होतेय. बदललेल्या रणनीतीत सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना आघाडीवरून मोर्चा सांभाळावा लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी म्हणजे थेट दबावाचं शस्त्र. कॅगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, मार्को यानसन, केशव महाराज आणि कर्णधार एडन मार्क्रम यांच्या गोलंदाजी ताफ्यात अनुभव, वेग आणि फिरकी सगळंच आहे. गेल्या दोन महिन्यांत हे दोन्ही संघ सहाव्यांदा भिडत आहेत; म्हणजेच चुकांसाठी अजिबात जागा नाही.

फलंदाजीत धोक्याची घंटा

गट फेरीत हिंदुस्थानला मोठा धक्का बसला नसला तरी फलंदाजीतील उणिवा लपलेल्या नाहीत. ईशान किशन (दोन अर्धशतके, 202 स्ट्राईक रेट) वगळता टॉप-4 मधील कोणीही स्फोटक दिसलेला नाही. अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला असून त्याला स्पर्धेतील पहिल्या धावेची अजूनही प्रतीक्षा आहे.

गोलंदाजी खरी ढाल!

हिंदुस्थानला जेतेपदाचा ठोस दावेदार बनवणारी गोष्ट म्हणजे गोलंदाजी. वरुण चक्रवर्ती 4 सामन्यांत 9 विकेट, इकॉनॉमी 5.16. जसप्रीत बुमराह प्रति षटक केवळ 6 धावा. मात्र क्विंटन डिकॉक, ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड मिलर यांना रोखण्यासाठी संपूर्ण युनिटला एकत्रित आक्रमक कामगिरी करावी लागेल.

प्रतिस्पर्धी संघ –

हिंदुस्थान – सूर्यकुमार यादव (कर्णधार), ईशान किशन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका – एडन मार्क्रम (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रयान रिकलेटन, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, मार्को यानसन, कॅगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, केशव महाराज, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्किया, क्वेना मफाका, जॉर्ज लिंडे, जेसन स्मिथ.