
गुरुवारी कोलंबोच्या उकाड्यात एक वेगळीच थंडी पसरली. कारण झिम्बाब्वेने यजमान श्रीलंकेला असा धक्का दिला की प्रेमदासा स्टेडियम क्षणभर स्तब्ध झाले. झिम्बाब्वेच्या सिकंदरपुढे सिंहगर्जना झालीच नाही. परिणामतः विजयाची हॅटट्रिक नोंदवणाऱया श्रीलंकेला पराभवाचा धक्का बसला. टी-20 वर्ल्ड कपमध्ये मृत्यू गटात आणि एक सनसनाटी निर्माण करणारा सामना झाला. दुबळय़ा भासणाऱया झिम्बाब्वेने श्रीलंकेचा चक्क 6 विकेटनी पराभव केला आणि ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय योगायोग नव्हता, यावर या जबरदस्त कामगिरीने शिक्कामोर्तब केले.
बेनेटचा संयम अन् रझाचा तडाखा
179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने संयम आणि आक्रमणाचा सुरेख संगम साधला. सलामीवीर ब्रायन बेनेटने 48 चेंडूंत 8 चौकारांसह नाबाद 63 धावांची जबाबदार खेळी केली. एका टोकाला तो भक्कम उभा राहिला. दुसऱया टोकाला मात्र सिकंदर रझाने धडाकेबाज फटकेबाजीचा वर्षाव केला. त्याने 26 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांसह 45 धावा कुटत सामना झिम्बाब्वेकडे झुकवला. रझाच्या बिनधास्त फटकेबाजीने श्रीलंकेच्या आशा धुळीस मिळवल्या. रायन बर्ल (23) आणि तदिवानाशे मारुमणी (34) यांनीही उपयुक्त योगदान देत धावफलक वेगाने हलवला. झिम्बाब्वेने 19.3 षटकांत 4 बाद 182 धावा करत सामना खिशात घातला.
झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा अचूक वार
पथुम निस्सांका (62) आणि कुसल परेरा (22) यांनी अवघ्या 29 चेंडूंमध्ये 54 धावांची तुफानी सलामी दिली. स्टेडियममध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी सुरू असताना झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी गतीपेक्षा बुद्धिमत्तेचा आधार घेत खेळ पालटवला. फिलानी व्रेमर (2/27) आणि रिचर्ड इव्हान्स (2/35) यांनी मधल्या षटकांत धावांना लगाम घातला. ब्लेसिंग मुजरबानीनेही दोन विकेट घेत श्रीलंकेच्या फळीचा कणा वाकवला. पवन रत्नायकेने 44 धावांच्या झुंजार खेळीने श्रीलंकेला 7 बाद 178 अशी मजल मारून दिली.

























































