
ICC T20 World Cup 2026 ची जुगलबंदी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. चाहत्यांची उत्कंठाही शिगेला पोहोचली असून चौकार-षटकारांची चौफेर आतषबाजी पाहण्यासाठी चढाओढ पाहयला मिळणार आहे. एकीकडे क्रिकेटच्या या धामधुमीत धुरळा उडवून देण्यासाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी काही कमी होण्याच नाव घेत नाहीये. टीम डेव्हिड, जोश हेझलवूड आणि अष्टपैलू खेळाडू पॅट कमिंन्स हे ऑस्ट्रेलियाचे तगडे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. या तिन्ही खेळाडूंच्या टी20 वर्ल्ड कपमधील उपस्थितीवर ऑस्ट्रियाचे संघ निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
जॉर्ज बेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिंन्स टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यासाठी श्रीलंकेला जाणार नाही. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात पॅट कमिंन्स संघात नसल्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर विस्फोटक फलंदाज टीम डेव्हिड दुखापतीतून सावरत असून पहिल्या सामन्यात खेळण्यासाठी सज्ज असल्याची माहिती बेली यांनी दिली. तसेच वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूडच्या खेळण्यावर अजूनही सस्पेंस कायम आहे. हेझलवूड पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे, पण निश्चित नाही. ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना 13 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात पॅट कमिंन्स मैदानात उतरण्याची शक्यता आहे.


























































