
सध्या हिंदुस्थानची अवस्था भले आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णासारखी झालीय, सुपर-8च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांचा दारुण पराभवही सहन करावा लागलाय आणि नेट रनरेटही -3.80 वर घसरलेय. तरीही परवा अहमदाबादेत एक गुज्जू म्हणाला, पुछ पाने के लिए पुछ हरना पडता है. 8 मार्चला जिंकण्यासाठी 22 फेब्रुवारीला हरणं आवश्यक होतं. 2007 सालीसुद्धा पहिले जगज्जेतेपद जिंकताना सुपर एटचा पहिला सामना हरलो होतो. तसेच क्रिकेट हा केवळ आकडय़ांचा खेळ नाही. तो आठवणींचाही असतो. आता चाहत्यांना 2007 ची आठवण गोड झोप येऊ देत नाही. तसेही आपण नेहमीच इतिहासाच्या आकडय़ात रंगतो. आताही त्यात रंगूया.
2026चे अनोखे गणित
साखळीत अपराजित हिंदुस्थानने पाकिस्तानवर विजय मिळवला, पण सुपर-8मध्ये सुरुवातीलाच अनपेक्षित घसरगुंडी झाली. आता 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वे आणि 1 मार्चला वेस्ट इंडिज या दोन्ही सामन्यात मोठय़ा फरकाने जिंकणे अनिवार्य आहे. शिवाय दक्षिण आफ्रिकेने उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरच हिंदुस्थानचा मार्ग सुकर होईल. अन्यथा नेट रनरेटचा सापशिडीचा खेळ सुपर एटच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु असेल.
2007ची जादू
आठवतंय का 2007 सालचा विश्वचषक? 2007 मध्येही हिंदुस्थानने साखळी सामन्याते पाकिस्तानला हरवले होते. त्यानंतर सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून हार सहन करावी लागली होती. तेव्हा अनेकांनी हात टेकले. पण मग इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला हरवत हिंदुस्थानने उपांत्य फेरी गाठली. पुढे ऑस्ट्रेलिया आणि अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवले आणि महेंद्रसिंह धोनीचा तरुण ताफा जगज्जेता ठरला.
आता इतिहासाची पुनरावृत्ती?
2007 मध्ये सुपर एटमध्ये पहिला धक्का, नंतर धडाकेबाज पुनरागमन. 2026 मध्येही पहिला धक्का बसलाय. फरक इतकाच होती की, तेव्हा अनहोनी को होनी करणारा धोनी होता. आता सूर्या आहे. सोबतीला अडखळणारी आघाडीची फलंदाजी. दुरून पाहिल्यास हिंदुस्थानचा मार्ग कठीण आहे, नेट रनरेटचे गणित गुंतागुंतीचे आहे. निकाल बदलायला सोबत एक टक्का नशिबाची साथ हवीय. क्रिकेटमध्ये ‘अशक्य’ हा शब्द शब्दकोशात नसतो. 2007 चा आत्मा अजूनही जिवंत असेल तर 2026 ची कहाणीही तशीच रंगू शकते. फक्त जगज्जेतेपदाचा पुन्हा अभिषेक करण्यासाठी शर्माचे वादळ घोंगवायला हवे.



























































