Under 19 WC – सूर्यवंशी नामक त्सुनामी वर्ल्ड कपमध्ये धडकणार!

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध युथ वन डे मालिकेत वादळी फलंदाजी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणारा वैभव सूर्यवंशी आता 19 वर्षांखालील म्हणजेच युवा वर्ल्ड कपमध्ये त्सुनामीसारखा धडक देण्यासाठी सज्ज झाला आहे. 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या मेगा स्पर्धेत हिंदुस्थानची युवा टीम अमेरिकेविरुद्ध मोहिमेची सुरुवात करणार असून, सर्वांच्या नजरा वैभववर खिळल्या आहेत. कारण वैभव मैदानात उतरताच विक्रमांना तुफानी खेळींनी वाहून घेऊन जातोय. त्यामुळे युवा वर्ल्ड कपमध्ये वैभवच्या बॅटीतून अनेक विक्रमांना जलांजली वाहिली जाणार, हे निश्चित आहे.

वैभवची खरी ओळख म्हणजे त्याची आक्रमक फलंदाजी आणि सीमारेषांवरचा निर्दय प्रहार. त्याच्या धावांपैकी मोठा वाटा चौकार-षटकारांतून येतो. त्यामुळेच युवा वर्ल्ड कपच्या एका हंगामातील सर्वाधिक 18 षटकारांचा डेवाल्ड ब्रेविसचा विक्रम थेट धोक्यात आला आहे. वैभवची फटकेबाजी पाहता हा विक्रम मोडणे अशक्य वाटत नाही.

इतकेच नव्हे तर स्ट्राइक रेटमध्येही इतिहास बदलण्याची शक्यता आहे. 2004 मध्ये शिखर धवनने नोंदवलेला 93.51 चा सर्वोत्तम स्ट्राइक रेट वैभव सहज मागे टाकू शकतो. कारण तो सातत्याने 150 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा काढतो. हिंदुस्थानींकडून सर्वाधिक धावांचा सरफराज खानचा (566) विक्रम सर्वाधिक शतकांचा धवन-बर्नहॅमचा विक्रम आणि 191 धावांची सर्वात मोठा वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या हे सगळे आकडे वैभवच्या रडारवर आहेत.

इतिहासात आजवर कुणालाही युवा वर्ल्ड कपमध्ये द्विशतक झळकावता आलेले नाही. मात्र वैभव सूर्यवंशीकडे ते अशक्य शक्य करण्याची क्षमता आहे. जर फॉर्म, आत्मविश्वास आणि संधी यांचा मेळ बसला तर हा वर्ल्ड कप विक्रमांचा नाही, तर वैभव सूर्यवंशीच्या त्सुनामीचा म्हणून ओळखला जाईल.