
ICC Women’s World Cup मध्ये टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये विशाखापट्टणम येथे सामना खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भंबेरी उडवली होती. 100 धावांवर टीम इंडियाचा अर्धा संघ तर 153 वर 7 विकेट पडल्या होत्या. या कठीण परिस्थितीत रिचा घोषणे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का देत विस्फोटक फलंदाजी केली आणि संघाचा डाव सावरला. त्यामुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 251 धावा करत 252 धावांच आव्हान दिलं आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी निर्णय घेत टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत एकामागे एक टीम इंडियाला हादरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे 157 वर सात विकेट अशी टीम इंडियाची अवस्था झाली होती. परंतू रिचा घोषने 77 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकारांच्या जोरावर 94 धावांची वादळी खेळी केली. रिचाने आपल्या 7 व्या वनडे अर्धशतकासह 1000 धावांचा टप्पा सुद्धा पार केला. रिचाला स्नेह राणाने चांगली साथ दिली. तिने 24 चेंडूंचा सामना करत 33 धावा केल्या. यांच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. प्रतिका (37), स्मृती (23) आणि हर्लिन (13) स्वस्तात माघारी परतल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या होत्या. परंतू रिचा घोष आणि स्नेह राणाने डाव सावरल्यामुळे टीम इंडियाने 251 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेच्या क्लो ट्रायॉनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर मॅरिझॅन कॅप, नॅडिन डी क्लार्क, नॉनकुलुलेको म्लाबा यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आणि तुमी सेखुखुने एक विकेट घेतली.