अकरावी ऑनलाइन प्रवेश : ‘आयसीएसई’च्या पहिल्या पाच विषयांचेच गुण ग्राह्य धरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करणाऱया आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ऑनलाईन अर्जात भरायचे आहेत. आयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर एकूण 6 विषयांचे सरासरी गुण दर्शविण्यात आले आहेत मात्र यांपैकी पहिल्या पाच विषयांचेच सरासरी गुण अकरावी प्रवेशात ग्राह्य धरले जाणार असल्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.

शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे आयसीएसईच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असून विद्यार्थ्यांना आता नव्याने प्रवेशअर्ज भरावा लागत असून विद्यार्थ्यांनी आधी भरलेले सहा विषयांचे सरासरी गुण आणि आत्ताचे पाच विषयांचे सरासरी गुण यामध्ये किंचित कमी-जास्त बदल झाला आहे. आयसीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांच्या गुणपद्धतीमधील विषयांच्या ग्रुपमध्ये बदल केला आहे. परिणामी अकरावी प्रवेशामध्ये या मंडळाच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याने शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचे गुणपत्रिकेकरील पहिल्या 5 विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे.

एसएससी बोर्डाचा निकाल यंदा घसरल्याने अकरावी प्रवेशात इतर बोर्डाच्या भरघोस गुणांमुळे एसएससीचे विद्यार्थी मागे पडणार होते. त्यामुळे सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांना समान पातळीवर आणण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाकडून होताना दिसत आहे.

  • आयसीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांच्या गुणपद्धतीत ग्रुप एक, ग्रुप दोन आणि ग्रुप तीन अशी विषयांची वर्गवारी केली होती.
  • परंतु मंडळाने यंदा या ग्रुपमध्ये बदल केला. यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.
  • त्याचप्रमाणे ग्रुपमधील विषय वर खाली करण्यात आल्याने आयसीएसई विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणांमध्ये वाढ झाली आहे.  

कायदेशीर सल्ला घेणार

आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे सरासरी सहा ऐवजी पाच विषयांचे गुण ग्राह्य धरण्याच्या निर्णयोविरोधात कायदेशीर सल्ला घेणार आहे. यापूर्वीच आम्ही आयसीएसई बोर्डाकडे याप्रकरणी पत्रव्यवहार केला असून कोणत्याही बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे गुण कमी करण्याचा सरकारला अधिकार नाही. यावर आम्ही ठाम असून आयसीएसई बोर्डाचाही आमच्या म्हणण्याला पाठिंबा आहे. – अनुभा सहाय, अध्यक्ष  

गुण बदलून सुट्टीच्या दिवशीही अर्ज ऍप्रूव्ह होणार

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना आता सरासरी पाच विषयांचे गुण ऑनलाईन अर्जात भरायचे असल्याने त्यांना अकरावीचा अर्ज पुन्हा एकदा भरावा लागणार आहे. ही सुविधा या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रावर किंवा शाळांमध्ये उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी शनिवार, 22 जून आणि रविवार, 23 जूनलाही अर्जाचा भाग 1 व 2 ऍप्रूव्ह करण्याची सुविधा मार्गदर्शन केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टीवाय बीएस्सीचा निकाल अवघ्या 30 दिवसांत जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने टीवाय बीएस्सीचा निकाल अवघ्या तीस दिवसांत जाहीर केला आहे. हा निकाल विद्यापीठाच्या www.mu.ac.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेला 8554 विद्यार्थ्यांपैकी 3622 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुनर्मूल्यांकनासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित वेळेतच अर्ज सादर करावेत, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे. TYBSc हा विद्यार्थींच्या करीअरमधील निर्णायक व महत्त्वाचा टप्पा असून पुढील अनेक संधींचे दालन विद्यार्थ्यांना उपलब्ध होते, असे सांगत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.