वर्षभरानंतर मृतदेहाला ‘ओळख’ मिळाली, रेकॉर्डवरील आरोपीची चौकशी करताना त्याचा ‘भाऊ’ सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

गुन्हेगारांना शोधण्यासाठी सुरू केलेल्या क्रिमिनल सर्व्हिलन्स प्रोजेक्टमुळे (क्रिप्स) वर्षभरापासून बेवारस असलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात बोरिवली रेल्वे पोलिसांना यश आले. राजेश लल्लन चौधरी (27) असे त्याचे नाव आहे.

क्रिप्सअंतर्गत बोरिवली रेल्वे पोलिसांना एक टास्क दिला होता. पोलीस हवालदार एम. मोहिते, तडवी यांच्या पथकाने चोरीच्या गुह्यात अटक केलेल्या राकेश चौधरीचे घर शोधून काढले. त्याला चौकशीकरिता पोलीस ठाण्यात आणले तेव्हा सहायक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांनी राकेशची चौकशी केली. त्याचे वडील, भाऊ काय करतात याबाबत विचारणा केली तेव्हा राकेशने आपला मोठा भाऊ गेल्या वर्षभरापासून बेपत्ता आहे. त्या प्रकरणी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात मृत झालेल्याची माहिती काढली तेव्हा राजेश हा बेवारस मृत असल्याची बोरिवली रेल्वे पोलिसांकडे नोंद होती. पोलिसांनी राजेशचा फोटो राकेशला दाखवला. हातावरील गोंदण आणि चेहर्‍यावरून राजेशची ओळख पटली.

रवींद्र सेनगावकर यांनी रेल्वे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यावर क्रिप्स प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यांना दररोज मुख्यालयातून गुन्हेगाराची यादी दिली जाते. यादीनंतर पोलीस गुन्हेगाराच्या घरी जातात व त्याची माहिती घेतात. जर एखादा गुन्हेगार सापडला तर तो सध्या काय करतो याची माहिती घेतली जाते.

वर्षभर नातेवाईक घेत होते शोध

राजेश हा कांदिवली येथे कामाला होता. ऑगस्ट महिन्यात कामाला जातो असे सांगून तो घराबाहेर पडला  मात्र तो घरी परतलाच नाही. राजेशच्या कुटुंबातील एकजण असाच घरातून गेला होता पण तो काही वर्षानी घरी परतला होता. तसाच राजेशही घरी येईल असे नातेवाईकांना वाटत होते.