बॉडी ओळखण्यासारखी नसताना, कागदपत्रे जळली कशी नाही? अजित पवारांच्या अपघाती निधनावरून अमोल मिटकरींनी उपस्थित केले प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर विमानाच्या लँडिंगदरम्यान अपघात झाला. ज्यात अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. यातच आता अजित पवार यांच्या अपघाती निधनावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “दादांची बॉडी ओळखण्यासारखी नसताना, कागदपत्रे जळली कशी नाही?” असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना अमोल मिटकरी म्हणाले की, “अजितदादांना जाऊन आज पाच दिवस झाले आहेत. अख्खा महाराष्ट्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आणि आम्ही सर्व पक्षीय नेते अजूनही त्या धक्क्यात आहेत. अजितदादांच्या मृत्यूसंदर्भातील अनेक चर्चा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहारापर्यंत आहे. राजभवनच्या शपथविधीपूर्वी तशा चर्चा काल मी ऐकल्या..देवगिरीवर असताना. नंतर लोकांनी मला विचारलं, काही लोकांच्या सांगण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली,दादांचा मृतदेह ओळखण्यासारखा नसताना कागदपत्रांना साधा जाळ लागला नाही. कागदपत्र कसे जळाले नाहीत? प्रश्न असे आहेत की, विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं? विमानात सहा लोक बसले होते, अशा बातम्या टीव्हीवर चालल्या. मी माहिती घेतली त्यात पाच लोकांची नावं दिसत आहेत. एक कॅप्टन, को -कॅप्टन, माळी नावाची मुलगी, अजितदादा आणि त्यांचे बॉडीगार्ड विदीप जाधव,असे पाच लोक होते. पण सहा लोकांची बातमी चालली.”

ते म्हणाले आहेत की, “विमान १०० घिरट्याही घालून सेफ लेंडीग करू शकलं असतं आणि दादांचा जीव वाचू शकला असता. व्हिजिबिलीटी नाही असं सांगितल्यानंतर निरोप आला होता की पुण्याला लँड करा, मग तसं का केलं नाही? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.”