शिवसेनाप्रमुख नसते तर भाजप सत्तेत आलीच नसती, मुझफ्फर हुसैन यांनी सुनावले

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत हिंदुत्वाचा गजर केला आणि देशाला एक दिशा दिली. बाळासाहेब नसते तर भारतीय जनता पक्ष सत्तेतच आला नसता, असे रोखठोक प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसैन यांनी केले.

भाईंदर पूर्व इंद्रलोक येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलादालनाला हुसैन यांनी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, देशात आणि राज्यात भाजपची ताकद नव्हती. त्यावेळी शिवसेनेच्या मदतीने भाजपने राज्यातील राजकारणात पाय रोवले हे कुणालाही नाकारता येणार नाही. एक नेता.. एक विचार.. एक दिशा दाखवत शिवसेनाप्रमुखांनी राजकारणात वेगळा ठसा उमटवला. त्यांनी कधीही जातीवाद आणि धर्मवाद केला नाही. हे शिवसेनाप्रमुखांचे आगळेवेगळे वैशिष्टय़ आहे असेही हुसैन म्हणाले.

शिवसेना आणि मुस्लिम लीग एकत्र

बाळासाहेब ठाकरे कलादालनात मीरा रोडचे संस्थापक सय्यद नजर हुसैन यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लिम लीगचे खासदार गुलाम महेमुद बनातवाला यांच्या हस्ते 1979 मध्ये नयानगर शहराची पायाभरणी करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचे छायाचित्रही या कलादालनात आहे. त्याचा आवर्जून उल्लेख मुझफ्फर हुसैन यांनी केला. ते म्हणाले, मुस्लिमबहुल नयानगरशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भावनिक नाते जोडले गेले आहे.  जातीय राजकारण करणाऱयांनी त्याची नोंद घ्यायला हवी.