
नितीश कुमार नाही तर, मी होणार बिहार पुढील मुख्यमंत्री, असं राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव म्हणाले आहेत. टीव्ही९ भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले आहेत. बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दुसरा कोणताही चेहरा नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या बेशुद्ध अवस्थेत आहेत, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “याची अधिकृत घोषणा योग्य वेळी केली होईल. २०२० मध्ये कोण होता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? आम्ही होतो, दुसरा कोणी चेहरा होता का? आमची स्वतःची रणनीती आहे. आम्ही यावर निर्णय घेऊ.” ते म्हणाले, “आम्ही जागावाटपवर चर्चा करत आहोत. जागावाटप झाल्यावर जाहीरनामा ठरवला जाईल. याची आम्ही एकत्र घोषणा करू.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लेखाबाबत तेजस्वी यादव म्हणाले, “अमित शहा यांनी काही काळापूर्वी एक लेख लिहिला होता, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, नितीश कुमार हे नेतृत्व करतील. निवडणुकीनंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, हे काळच सांगेल. अशा प्रकारे, ते असं म्हणत आहेत की, नितीश कुमार त्यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून स्वीकारत नाहीत, हे स्पष्ट आहे.”