…तर पहलगाम हल्ला तुम्हीच घडवून आणला का? ममता बॅनर्जी यांचा अमित शहांना जळजळीत सवाल

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. बंगालमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या तीन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. पश्चिम बंगालमधून घुसखोरी होत असून बंगालमध्ये दहशतवाद्यांचे नेटवर्क सक्रिय असल्याचा आरोप शहा यांनी केला. याचा ममता बॅनर्जी यांनी खरपूस समाचार घेतला.

अमित शहा यांच्या विधानावर निशाणा साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी नाहीत, तर मग पहलगामचा हल्ला कसा झाला? पहलगामचा हल्ला तुम्हीच घडवून आणला का? दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या घटनेमागे कोण होते? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. त्या बांकुरा येथील बीरसिंहपूरमध्ये आयोजित सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची तुलना महाभारतातील ‘दुर्योधन’ आणि ‘दुशासन’ यांच्याशी केली.

शकुनीचा शिष्य असलेला दुशासन बंगालमध्ये माहिती गोळा करण्यासाठी आला आहे. निवडणुका जवळ आल्या की दुर्योधन आणि दुशासन दिसायला लागतात, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी नाव न घेता मोदी आणि शहांवर केली.

निवडणूक आयोगाच्या मतदार यादी सुधारणा (एसआयआर) मोहिमेवर ममता बॅनर्जी यांनी कडाडून टीका केली. एसआयआरच्या नावाखाली राज्यातील जनतेचा छळ केला जात आहे. सुमारे दीड कोटी मतदारांची नावे कापण्याचे नियोजन सुरू असून राजबंशी, मतुआ आणि आदिवासी यांसारख्या अल्पसंख्याक समुदायांना लक्ष्य केले जात आहे. एसआयआरमध्ये एआयचा वापर करणे हा एक मोठा घोटाळा आहे, असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच एकाही वैध मतदाराचे नाव कापले गेले, तर दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला.

अमित शहा यांनी ममता सरकारवर घुसखोरीला खतपाणी घालत असल्याचा आणि सीमेवर कुंपण घालण्यासाठी जागा न दिल्याचा आरोप केला होता. यावर ममता बॅनर्जी यांनीही प्रत्युत्तर दिले. राज्याने जमीन उपलब्ध करून दिल्यानेच रेल्वे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पेट्रापोल आणि चांगराबंदा येथील सीमेसाठी जमीन आधीच देण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात बंगाली स्थलांतरित मजुरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दाही उपस्थित केला.