
शासकीय सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवून अटक वॉरंट जारी केले. तरीसुद्धा राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ‘मंत्र्यालाच पोलिसांनी पळविले असेल, तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय?’ असा सवाल वंचित आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.
कोर्टाला आणि न्यायही मानत नाही, अशी ही परिस्थिती असल्याची खोचक टीका करत कायद्याचा अपमान होणार नाही, याची दक्षता मुख्यमंत्री फडणवीसांनी घ्यावी. कायद्याचा अवमान होऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतरही मंत्री गायब असणे हे गंभीर आहे. कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लपविले जात असल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला. तसेच दोन वर्षांची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधींचा मताचा अधिकार संपुष्टात येतो, याची आठवण करून देताना, कायद्याचा आणि न्यायालयाचा अपमान होणार नाही, याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घ्यावी, असा टोलाही आंबेडकर यांनी लगाविला.





























































