न्यायालयीन ताण घरी घेऊन गेलो तर आरोग्यावर परिणाम होईल, न्यायमूर्तींनी वकिलांना सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-high-court

न्यायालयीन कामाच्या ताणाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे अशिलांची बाजू मांडताना पक्षकार वकिलांनी व्यवस्थेचा आदर करण्याची गरज आहे. इतकेच काय, न्यायालयातील सगळा ताण घरी घेऊन गेलो असतो तर आतापर्यंत आपण रुग्णालयात दाखल असतो, अशी टिप्पणी न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने केली.

आर्थिक अनियमितता आणि इतर कारणांवरून लिलावती रुग्णालयातील वादाप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने म्हटले की, अनेकदा आम्ही वकिलांना फटकारतो याचा अर्थ आम्ही त्यांच्या विरोधात असतो असे नाही, तर याउलट तो वकील एखाद्या प्रकरणात त्याला अपेक्षित असलेला आदेश घेऊन कोर्टरुमच्या बाहेर पडतो हा कामाचा भाग असल्याचे न्यायमूर्ती म्हणाले. कोर्टातील न्यायमूर्ती आणि न्यायिक अधिकारी कामादरम्यान झालेला संताप, रोष सोबत घेऊन जात नाहीत किंबहुना ते परवडणारे देखील नाही, असे देखील न्यायमूर्ती म्हणाले.