इफ्फीची आजपासून सुरुवात होणार, अक्षय कुमारची विशेष उपस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

49  वा आंतराराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फीचा मंगळवारी म्हणजेच २० नोव्हेंबर २०१८ रोजी संध्याकाळी पणजी येथे एका दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ होणार आहे. यंदाच्या या चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन समारंभात नव्या भारताचे दर्शन ही संकल्पना चित्रपटांच्या  विविध छटांच्या मार्फत साकारली जाणार आहे. शुभारंभाच्या  90 मिनिटांच्या कार्यक्रमात भारतीय चित्रपटसंस्कृती आणि परंपरेचे विविधरंगी आणि समृद्ध चित्रमय दर्शन रसिकांना बघायला मिळेल.

इतिहास, अॅक्शन आणि रोमान्स या चित्रपटातील महत्वाच्या संकल्पनांचे दर्शन उद्‌घाटन सोहळ्यात रसिकांना घडेल. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकर आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी या उद्‌घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अक्षय कुमार, करण जोहर, ज्युलिअन लँदियास,ऋषिता भट, मधुर भांडारकर, सुभाष घई, अरिजित सिंग, रमेश सिप्पी आणि चीन हान यांच्यासारखे नामवंत कलाकारही शुभारंभाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात संध्याकाळी साडे चार वाजल्यापासून हा सोहळा सुरु होईल. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरुन तसेच पीआयबीच्या अधिकृत यूट्युब चॅनलवरुन या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. याचवेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट सुविधा कार्यालयाचेही उद्‌घाटन होईल. यावेळी महोत्सवाचा शुभारंभाचा चित्रपट ‘द अस्पर्न पेपर्स’ चित्रपटमधली काही दृश्‍य या समारंभात प्रेक्षकांना दाखवली जातील. त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ज्युलियन लॅन्डिस प्रेक्षकांशी संवाद साधतील. आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेचे ज्यूरी आणि पोलीश दिग्दर्शक रॉबर्ट ग्लिन्सकी हे ही यावेळी आपले विचार मांडतील. इतर ज्यूरी सदस्यही यावेळी उपस्थित असतील.