‘इफ्फी’ महोत्सवाचा बिगुल वाजला! 20 ते 28 नोव्हेंबरला रंगणार महोत्सव

चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात ‘इफ्फी’ महोत्सवाचे बिगुल वाजले आहे. महोत्सवाचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान गोव्यात हा महोत्सव रंगणार आहे. नुकतीच ओपन एअर स्क्रिनिंग विभागात दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांची यादी जाहीर करण्यात आली असून यात ‘आनंदी गोपाळ’ या सिनेमाची वर्णी लागली आहे.

‘जॉय ऑफ सिनेमा’ अशी ओपन एअर स्क्रिनिंगची संकल्पना आहे. 21 ते 27 नोव्हेंबरला जॉगर्स पार्क, अल्तिनो आणि मीरामार बीच या दोन ठिकाणी ओपन एअर स्क्रिनिंग ठेवण्यात येणार आहे. हे सर्वांसाठी खुले असून यासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही तसेच यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

जॉगर्स पार्क अल्तिनो येथे  ‘चलती का नाम गाडी’ (1958), ‘पडोसन’ (1968), ‘अंदाज अपना अपना’ (1994), ‘हेरा फेरी’ (2000), ‘चेन्नई एक्स्प्रेस’ (2013), ‘बधाई हो’ (2018), ‘टोटल धमाल’ (2019) हे सिनेमे पाहता येतील. तर  मीरामार बीच येथे ‘नाचू या कंपूसार’ (कोंकणी), ‘सुपर 30’ (हिंदी), ‘आनंदी गोपाळ’ (मराठी), ‘उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ (हिंदी), ‘हेलारो’ (गुजराती), ‘गली बॉय’ (हिंदी), ‘फन ऍण्ड फ्रस्ट्रेशन’  (तेलुगू) हे सिनेमे पाहता येतील.

इंडियन पॅनारोमा विभागात सहा मराठी सिनेमे पाहायला मिळणार आहेत. यात शिवाजी लोटन पाटील यांचा ‘भोंगा’, आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शित ‘फोटो फ्रेम’, संजय ढाकणे दिग्दर्शित ‘तुझ्या आईला’, गणेश शेलार यांचा ‘गढूळ’ तर फीचर चित्रपट विभागात ‘आनंदी गोपाळ’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या