
वेगाने वाढणाऱया शहरांमुळे वातावरण बदलतेय, पाण्याची स्रोते आटत चालली आहेत आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहे, असा इशारा पवई येथील आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञांनी दिला आहे. सॅटेलाइट इमेजेसच्या सहाय्याने शास्त्रज्ञ या निष्कर्षाप्रत पोहोचले. आर्थिक केंद्रे बनण्यासाठी जगातील शहरांचा विकास होत आहे. पण तो विकास टिकाऊ असावा याचेही भान ठेवले पाहिजे, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
आयआयटी मुंबईच्या सेंटर ऑफ स्टडीज इन रिसोर्सेस इंजिनीयरिंगचे (सीएसआरई) शास्त्रज्ञ डॉ. प्रिया मेंदायरत्ता आणि प्रा. शिरीष गेडाम यांनी सॅटेलाइटद्वारे यासंदर्भात अभ्यास केला. विकासाच्या अमर्याद वेगात शहरांचा विशेषकरून मुंबईचा मूळ आराखडा कसा बदलला आहे याचा अभ्यास त्यांनी केला.
जगातील सर्वात दाट लोकसंख्या मुंबई, ठाणे, रायगडमध्ये
ऑब्जेक्ट बेस्ड इमेज ऍनालिसिस या तंत्राचा वापर करून शास्त्रज्ञांनी 1972 ते 2011 या चार दशकांमधील उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला. या कालावधीत मुंबई, मुंबई उपनगरे तसेच ठाणे आणि रायगडच्या काही भागांमध्ये इमारतींचे दाट जाळे कसे पसरत गेले आणि हा भाग जगातील सर्वात दाट लोकसंख्येचा शहरी भाग बनला हे या छायाचित्रांवरून स्पष्ट होते. चार दशकांत या भागांमधील सुपीक जमीन, जंगले आणि पाण्याचे स्रोत नष्ट करून बांधकामे साडेचार पटींनी वाढली आणि लोकसंख्या तीन पटींनी वाढली. परिणामी वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढला आणि बांधकाम खर्चही वाढत गेला असे या अभ्यात अहवालात म्हटले आहे. मुंबई ही उत्तरेकडे वसई-विरारपर्यंत, पूर्वेकडे भिवंडीपर्यंत आणि दुसरीकडे ठाणे खाडीच्या पलीकडे नवी मुंबईपर्यंत वाढत गेली, परंतु हा विस्तार करताना पर्यायी रोजगार केंद्रे आणि औद्योगिक विकास केला गेला नाही तसेच बाजार निर्माण केले गेले नाहीत. उद्योग उभारले गेल्याने ठाण्यामध्ये खाडी बुजवून शहरीकरण झाले. पाण्याचे स्रोत असलेल्या जमिनीवर बांधकामे केल्याने मुंबईच्या किनारपट्टी भागातील पर्यावरणावर दुष्परिणाम झाला असे शास्त्रज्ञांनी अहवालात म्हटले आहे.



























































