
सरकारी लसीकरण केंद्र असूनही पवईच्या आयआयटी मुंबईतील रुग्णालय विद्यार्थ्यांना लस देण्यात अपयशी ठरले आहे. आता बाहेर जाऊन विद्यार्थ्यांना पैसे भरून लस घ्यावी लागणार आहे, पण कॅम्पसबाहेर जाणार कसे? कारण बाहेर जाऊन पुन्हा कॅम्पसमध्ये आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन राहणे आयआयटी व्यवस्थापनानेच अनिवार्य केल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत.
आयआयटीच्या कॅम्पसमध्ये असणाऱया रुग्णालयामध्ये लसीकरण मोहीम राबवावी अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली होती. त्या विनंतीवरूनच रुग्णालयाने सरकारी लसीकरण केंद्र म्हणून नोंदणी केली, परंतु लसी उपलब्ध होत नसल्याने लसीकरण थांबवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आता लस घ्यायची झाल्यास कॅम्पसबाहेरील सरकारी किंवा महापालिका रुग्णालयात जावे लागेल अन्यथा एका डोससाठी एक हजार रुपये भरून खासगी रुग्णालयात लस घ्यावी लागेल.
खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने लसीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थी आणि कॅम्पसमध्ये राहणारे रहिवासी यांचे लसीकरण त्यात होऊ शकते, परंतु अद्याप कोणत्याही रुग्णालयाचा प्रतिसाद मिळालेला नाही असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. सध्या आयआयटीच्या कॅम्पसमध्ये तीन हजार विद्यार्थी राहत आहेत. विद्यार्थी कॅम्पसबाहेर जाऊन सरकारी किंवा पालिका रुग्णालयात लस घेऊ शकतात, पण त्यांना कॅम्पसबाहेर जाण्यास परवानगी नाही. यापूर्वी लसीकरणासाठी बाहेर गेलेले विद्यार्थी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले होते असे व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.























































