मालाड पूर्वमधील बेकायदा बांधकामांविरोधात पालिकेने धडक कारवाई करताना उभारलेले गाळे तोडले आहेत. मार्वे बीच टी जंक्शनजवळ दोन दिवसांतच हे गाळे उभारण्यात आले होते. याबाबत पालिकेकडे आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
मार्वे बीचजवळील बेकायदा बांधकामांविरोधात पालिकेकडे तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून संबंधित भागात नजर ठेवण्यात येत होते. मात्र गेल्या दोन दिवसांत या ठिकाणी गाळे उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. याबाबत तक्रार येताच पी उत्तर विभागाचे सहाय्यक अभियंता विजय मानकर यांच्या निर्देशानुसार उप अभियंता कुबेर शिंदे आणि प्रवीण मुलुक यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम राबवून संबंधित गाळय़ांवर बुलडोझर फिरवण्यात आला. दरम्यान, बेकायदा बांधकामांना नोटीस बजावल्यानंतरच बांधकामे तोडण्यात येतात. मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीचा फायदा घेऊन बेकायदा बांधकामे करीत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे फक्त दोन दिवसांत ही बांधकामे उभारण्यात आली होती. त्यामुळे तक्रार आल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आल्याची माहिती पी उत्तर कार्यकारी अभियंता सागर राणे यांनी दिली. या ठिकाणी आगामी काळात बेकायदा बांधकाम होऊ नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.