
मालवण ते तारकर्ली मार्गावर पर्यटकांना दिशाभुल करून फसवणूक करण्याचे गैरप्रकार वाढले आहेत. रोडछाप मार्केटर्सने उच्छाद मांडला आहे. तरी या अनधिकृत मार्केटर्सचा वेळीच बंदोबस्त करावा. अशी मागणी तारकर्ली पर्यटन विकास संस्था व पर्यटन व्यवसायिकांनी तहसीलदार अजय पाटणे व पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या प्रकरणी एमटीडीसीला माहिती देऊन योग्यती कारवाई केली जाईल, असे आश्वासन तहसीलदार पाटणे यांनी व्यवसायिकांना दिले.
यावेळी बाबा मोंडकर, मिलिंद झाड, देवानंद लोकेगावकर, रवींद्र खानविलकर, अशोक तोडणकर, श्रीकृष्ण तळवडेकर, सहदेव साळगावकर, केदार झाड, अवि सावंत यांसह अन्य पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते. प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर 67 व्यवसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अनधिकृत रोड मार्केटर्सच्या विरोधात तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने मोहीम छेडण्यात आली आहे. पर्यटकांची फसवणुक टाळत त्यांच्या प्रबोधनासाठी बॅनरही लावण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनानेही या बॅनरवर आपला हेल्पलाईन नंबर द्यावा. त्यामुळे मार्केटर्सवर आळा बसेल व वादाची स्थिती निर्माण होणार नाही. याबरोबरच शासनाच्या वतीने अधिकृत टुरिस्ट गाईड उपलब्ध झाल्यास ते फायद्याचे होईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
कुंभारमाठ, देऊळवाडा सागरी महामार्ग, भरड नाका, शिवाजी पुतळा, भूतनाथ पानंद नाका, तारकर्ली एमटीडीसी गेट परिसर, रांजेश्वर मंदिर परिसर, इस्दा स्कुबा सेंटर गेट याठिकाणी व संपूर्ण मार्गावर रोडसाईट भुरटे मार्केटर्स स्कुटरवरून पाठलाग करत गाडीतील पर्यटकांशी संपर्क करण्याचा धोकादायक प्रयत्न करतात. घोळक्याने नाक्यांक्यावर उभे राहतात. कमी दराने रूम देतो असे सांगून आडमार्गावर रुम देतात. अन्य फसव्या स्कीम सांगून पर्यटकांना फसविले जाते.
वाद विकोपाला जाईल
अनधिकृत स्टोलवर घोळक्याने बसणे, पर्यटक नसलेल्या रिकाम्या वेळेत पत्ते, जुगार व नशापान करणे असे गैरप्रकार अनधिकृत मार्केटर सुरू ठेवतात. या मार्केटर्सची गौरकृत्ये सुरू राहिल्यास वाद विकोपाला जाईल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तरी या मार्केटर्सचा बंदोबस्त करावा अशी मागणी पर्यटन व्यवसाईकांनी निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
























































