बेकायदा पार्किंग दंडाच्या नव्या दरनिश्चितीसाठी 13 सदस्यीय समिती लवकरच सुधारित दर जाहीर करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदा पार्किंगवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे पालिकेने जाहीर केले असून दंडाच्या नव्या दरनिश्चितीसाठी 13 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सुधारित दंडाची रक्कम जाहीर करणार आहे. सध्या बेकायदा पार्किंग करणाऱयांकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात येत आहे.

पालिकेच्या पार्किंगपासून 500 मीटरच्या आत बेकायदा पार्किंग केल्यास पाच ते दहा हजारांवर दंड वसूल केला जात आहे. अनेक सोसायटय़ांजवळ ही पार्किंग असल्याने रहिवाशांचाही या धोरणाला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन दर निश्चित करण्यासाठी गौतम चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेचे एक अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, तीन स्थायी समिती सदस्य, वाहतूक पोलीस आणि वाहतूक क्षेत्रातील दोन खासगी तज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे.

मोफत पार्किंग नाहीच, रहिवाशांना माफक दर

पालिकेकडून रस्त्यांवरील बेकायदा पार्किंग कमी करण्यासाठी 26 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रत्येक पार्किंगवर सुमारे 300 ते 400 वाहने पार्किंग करण्याची सुविधा आहे. दरम्यान, आगामी काळात मुंबईत रहिवाशांनाही त्या त्या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जहांगीर आर्ट गॅलरीजवळ पार्किंगच्या नावाखाली लूट

मुंबईत सध्या ए, बी, सी अशा तीन प्रकारांच्या पार्किंगसाठी 20, 40 आणि 60 असे दर आकारले जातात. तर पूर्ण दिवसासाठी 200 रुपये आकारले जातात. मात्र फोर्ट येथील जहांगीर आर्ट गॅलरीजवळ पार्किंगसाठी काही जणांकडून कारला फक्त एका तासासाठी तब्बल 100 रुपये वसूल केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे एक ते तीन तासांसाठी गाडी पार्क करणाऱयांना 300 रुपयांचा भुर्दंड पडत आहे. पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.