
सामना प्रतिनिधी । किल्लारी
औसा तालुक्यातील किल्लारी येथून वाहणाऱ्या तेरणा नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पात्रातील वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नदीच्या पात्राचे रुप बदलून गेले आहे. शासनाच्या करोडो रुपये किंमतीची नैसर्गिक संपत्ती चोरून नेली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
किल्लारी व परिसरातील गावच्या वाळूमाफियानी तेरणा नदीच्या पात्रात हैदोस घातला आहे. रात्रंदिवस चोरट्या मार्गाने वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. वाळू मोठया प्रमाणात उपसली जात असल्याने तेरणेचे पात्र खड्डेमय बनले आहे. या नदीच्या पात्राला भुयारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तेरणा नदीच्या पात्रात दिसेल तेथे वाळू खोदून काढण्याचे प्रकार सर्रास खुलेआम चालू असल्यामुळे वाहनांची गर्दी वाढली आहे. व रस्ते ख़राब होऊ लागले आहेत वाळूमाफियांनी वाळू साठविण्याचेहि प्रकार सुरू केले आहे. जेसीबीच्या साह्याने वाळूचे खोदकाम केले जाते व नंतर ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. तर त्या ट्रक्टरचा चालक हा अल्प वयाचा असतो. सदर प्रकार परिसरात होत असतानादेखील या भागातील महसूल विभागच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसते.
3 ते 4 हजार रु. प्रति ट्रॅक्टर किंमत घेतली जात आहे. वाळूवर अनेकजण मोठ्या प्रमाणात पैसा कमावत आहेत. दुसरीकडे नदीचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत चालले आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात जात आहे. आज स्थितीला नदीच्या काही भागात शोधून पाहिले तरी वाळू दिसेनाशी झाली आहे. नदीच्या पात्रात सर्वत्र खड्डेच दिसून येत आहे. आज घडीला या पात्राकडे पाहिल्यानंतर हेच का ते तेरणानदीचे पात्र असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत चालला आहे या नदीचे भविष्यात काय होईल? तेरणा नदीची पात्राचे काय होणार असा प्रश्न येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.





























































