
सामना प्रतिनिधी । बुलडाणा
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यांतील आईचा तांडा, किनगांव जट्टू परिसरांत काटे महाराज व दराडे यांचे गिट्टी खदानाचे प्लॅंट आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन येथे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या उत्खनन होत असुन बिबी, किनगांव जट्टू रोडवर या खदानामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत.
परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्या आहेत. येथे होणारे उत्खनन एवढे प्रचंड आहे कि परिसरातील शेतांमध्ये कोणतेच प्रकारची पिकं येत नाहीत. परिसरांत रोगाचे व निनावी आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. ही खदान गावालगतच असल्याने तेथे अवैधप्रकारचे उद्योग सुरू झालेले आहेत. ही खदान बंद करण्याबाबत किनगांव जट्टू ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तक्रार दिली. सर्व ग्रामस्थांनीही बंद करण्याची विनंती केली मात्र प्रशासनावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट या तक्रारींना केराची टोपली दाखवली. येथे केले जाणारे ब्लास्टींग येवढे प्रचंड आहेत की त्यामुळे लोकांच्या घरांना अक्षरश: तडे गेले आहेत. शासनाच्या आदेशांची पायमल्ली करून अक्षरश: गौण खनिजाची लूट चालू आहे त्यात कोट्यावधी रूपयांची उलाढाल सुरू आहे. ही खदान तात्काळ बंद करा, अशी तक्रार ग्रामस्थांतर्फे अशोक दायमा, सुभाष राठोड यांनी दिली. त्यांवर महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून अहवाल देण्याचे मुख्य सचिवांना दिले आहेत. ही खदान त्वरीत बंद करा, अन्यथा आम्ही जनआंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
































































