रामदेवबाबांवर देशद्रोहाचा खटला भरा! योगगुरूंना ‘आयएमए’चे इंजेक्शन; पंतप्रधानांना पत्र पाठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगगुरू रामदेवबाबा यांनी कोरोनावरील अॅलोपॅथी उपचार पद्धती, डॉक्टर्स आणि लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरविल्यामुळे संतप्त झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) त्यांना ‘इंजेक्शन’ दिले आहे. ‘आयएमए’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, रामदेवबाबांवर देशद्रोहाचा खटला भरा, अशी मागणी केली आहे.

योगगुरू रामदेवबाबा यांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूमागे अॅलोपॅथी उपचारपद्धती हे कारण असल्याचे म्हटले होते. तसेच लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही 10 हजार डॉक्टर आणि एक लाख लोक मृत्युमुखी पडल्याचा दावा त्यांनी व्हिडीओत केला. रामदेवबाबांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातील डॉक्टरांची प्रमुख संघटना असलेल्या ‘आयएमए’ने संताप व्यक्त केला. रामदेवबाबांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. दोन दिवसांपूर्वी रामदेवबाबांनी आपले विधान मागे घेतले; पण पुन्हा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे रामदेवबाबा आणि ‘आयएमए’मधील वाद थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीत.

कोरोनासारख्या महामारीत अहोरात्र काम करणाऱया डॉक्टरांवर अशी टीका करणे हा अपमान आहे. तसेच अॅलोपॅथी उपचार पद्धती, लसीकरणाबाबत अफवा पसरविणे गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे रामदेवबाबांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा, अशी मागणीच ‘आयएमए’ने पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.

1 हजार कोटींचा दावा

‘आयएमए’च्या उत्तराखंड शाखेने रामदेवबाबा यांना नोटीस पाठविली आहे. स्पेशल लेखी माफी मागा; अन्यथा एक हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला जाईल, असा इशारा नोटिशीत दिला आहे.

अटक करण्याची हिंमत कोणाच्या बापात नाही

रामदेवबाबांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आपल्याला अटक करण्याची हिमंत कोणाच्या बापात नाही, असे वादग्रस्त वक्तव्य करताना रामदेवबाबा दिसत आहेत. मात्र,  हा व्हिडीओ कधीचा आहे याची माहिती उपलब्ध नाही.