मुंबईत आजही जोरदार बरसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पावसाचा जोर कायम असून आज शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरात विविध ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. उद्या रविवारीदेखील काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मुंबईत अनेक भागात सकाळपासूनच जोरदार सरी बरसत होत्या. जोरदार पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. जोरदार वाऱयासह झालेल्या पावसामुळे संपूर्ण मुंबई नऊ ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. तर सात ठिकाणी शॉर्टसर्किट तर एका ठिकाणी भिंत कोसळल्याची घटना घडली, मात्र सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. मुंबईसह परिसरात गेल्या चार दिवसांपासून धुवाधार बरसणाऱया पावसामुळे मध्य रेल्वेला मोठा फटका बसला असून आज चौथ्या दिवशीही लेटमार्क लागला.

असा झाला पाऊस

मुंबई शहर 16 मिमी
पूर्व उपनगर 22 मिमी
प. उपनगर 28 मिमी

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱया मुसळधार पावसामुळे राज्याच्या विविध भागांतील नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. काही गावांचा संपर्क तुटला असून काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यातच आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच उद्या, 23 जुलै रोजी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह परभणी, हिंगोली, नांदेड या जिह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यवतमाळमध्ये 110 जणांना वाचवले

यवतमाळमधील पूस आणि पैनगंगा नदीला आलेल्या पुराचा फटका महागाव तालुक्यातील नागरिकांना बसला. या भागाला पुराचा वेढा पडला. त्यात 110 नागरिक अडकले होते. गावकऱयांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारतर्फे हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली. हेलिकॉप्टरने गावाच्या चहूबाजूंनी घिरटय़ा घातल्या, परंतु हेलिकॉप्टरला लॅण्ड होण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली नाही. दोन वेळा हेलिकॉप्टरने बचावकार्यासाठी प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाही. शेवटी एसडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने सर्वांना सुखरूप बाहेर काढले.

कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी वाढली

कोल्हापूर शहर आणि परिसरात पावसाने धुडगूस घातला आहे. सकाळी अकराच्या सुमारास राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पातळी 36 फूट इतकी झाली होती. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

– नांदेड जिह्यातील किनवट आणि माहूर तालुक्याला पावसाने झोडपले आहे. पैनगंगा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.

– बुलढाणा जिह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. लेंडी नदीला पूर आला आहे.

– नांदेडला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला. पुरामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला आहे.