Maharashtra Rain Update राज्यावर अस्मानी संकट, पालघर, पुण्याला आज रेड अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले आठवडाभर सुरू असलेल्या पावसाने कोकणासह राज्याला झोपडले असताना आता अस्मानी संकट अधिक गडद झाले आहे. शनिवार, 22 जुलैला पालघर आणि पुण्याला रेड अलर्ट दिला आहे तर मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम या जिह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जून अखेरीपासून दमदार सुरुवात करणाऱया पावसाने काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोर धरला असून मराठवाडा वगळता राज्यातील सर्व जिह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. बुधवारी रात्री खालापूरसारखी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट असलेल्या जिह्यांत विशेष काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

सिंधुदुर्गात सर्वाधिक पावसाची नोंद

गेल्या 24 तासांत सिंधुदुर्गात सर्वाधिक 150.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नांदेड आणि गडचिरोली विभागालाही पावसाचा फटका बसला असून येथील काही गावांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 20.5 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे गडचिरोली, नांदेड, रायगड, रत्नागिरी जिह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. पावसामुळे आतापर्यंत 8 हजारांहून अधिक नागरिकांना फटका बसला आहे. गेल्या 24 तासांत 2 जण बेपत्ता आणि 5 जण जखमी असून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.

मुंबई महापालिका सज्ज

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासक इकबालसिंह चहल यांनी हिंदमाता, अंधेरी यांसारख्या सखल भागांतील भागांची पाहणी करून अतिवृष्टी झाल्यास पाणी उपसण्यासाठी पंप तसेच भूमिगत टाक्यांची पाहणी केली. त्याचबरोबर महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. दरम्यान, मुसळधार पावसात चौपाटय़ा तसेच समुद्रकिनारी जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

अंधेरी सब वेमध्ये साचले पाणी

जोरदार सरी आणि संततधारेमुळे काही सखल भागांत पाणी साचले होते. किंग्ज सर्कल, अंधेरी सबवेमध्ये 2 ते 3 फूट पाणी साचल्याने प्रवाशांची कोंडी झाली. मुंबई महापालिका मुख्यालयासमोरच रस्त्याची चाळण झाली आहे. भर पावसात आज खड्डे बुजवले जात होते.

कुडाळमध्ये भातशेती पाण्याखाली

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकऱयांना बसला आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव कुरवाळ वाडीतील चंद्रकांत माळकर (75) आणि दशरथ माळकर (70) या शेतकऱयांनी आपल्या शेतात मंगळवारी भात लावला. गुरुवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे त्यांचे संपूर्ण शेत पाण्याखाली गेले. त्यामुळे हे भातशेत आहे की नदी, असा प्रश्न पडला आहे. डोळ्यासमोर शेती वाहून जाताना पाहून माळकर कुटुंबीय हतबल झाले आहेत. या प्रकरणी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

एनडीआरएफच्या सहा टीम तैनात

राज्यात जवळपास सहा ठिकाणी एनडीआरएफच्या टीम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगलीचा समावेश आहे. तर इर्शाळवाडी येथे एनडीआरएफच्या 4 टीम पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, पावसामुळे गडचिरोली जिह्यातील राजोली, हालवोरा आणि एटापल्ली या गावांतील लोकांना स्थलांतरित केले आहे. तर नांदेड जिह्यातील सुगाव, नागणी, गंजगाव, सिंधुदुर्गमधील साळगांव, बिबवणे, पाट, तेंडोली, वेताळ बांबर्डे येथील पूरपरिस्थितीमुळे स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

भंडाऱ्यात वीज कोसळून 20 महिला जखमी

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे वीज पडली. यात शेतात भातलावणी करणाऱया 20 महिला जखमी झाल्या आहेत. या दुर्घटनेतील जखमी महिलांना जवळच्या अडयाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे तर साकोली येथे वीज कोसळून दोन मजूर जखमी झाले आहेत. मुखेड तालुक्यात तीन तलाव फुटल्याने शेकडो हेक्टरमध्ये पाणी घुसले. माखणी येथे नाला ओलांडताना धोंडिबा हाळगीर हे वाहून गेले. धर्माबादमधील शिसरखोड, बामणी, येळेगाव, मनूर व संगम या गावांचा संपर्क तुटला आहे. ऑरेंज अलर्टमुळे उद्या, 22 जुलै रोजी शाळांना सुट्टी आहे.