मुंबई, उपनगरात पावसाचे धुमशान; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, पोलिसांच्या सूचना

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाने जोर धरला आहे. गुरुवार रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. त्यात शुक्रवारी सकाळी आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाली आणि पावसाच्या कोसळधारा सुरू झाल्या. आगामी दोन, तीन तासात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन, मुंबई पोलिसांनी केले आहे.

सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे, मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकांना अत्यंत आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला आहे. हवामान विभागाने किनारी भागात जाण्याचे टाळण्याचे निर्देश दिले आहेत.

जुलै महिन्यात तिसऱ्या आठवड्यामध्ये पावसाने चांगलाच जोर धरला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे मुंबई, ठाण्यातल्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी मध्यरात्री पासून पडणाऱ्या पावसामुळे, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. अंधेरी सबवे मधील रस्ता आता सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी काही काळ बंद करण्यात आला आहे.

कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईच्या लोकलवरही परिणाम झालेला आहे. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

मुंबई शहरात व लगतच्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे, वाहने सावकाश चालवा आणि विनाकारण घराबाहेर पडू नये. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून आपत्कालीन परिस्थितीत 100, 112 हे टोल फ्री क्रमांक डायल करा, असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.