
शहर आणि उपनगरांत शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी शाळांच्या प्रवेशद्वारापासून 100 मीटर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ची तातडीने काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने परिवहन विभाग, पोलीस खाते आणि महापालिकेकडे केली आहे.
मुंबईतील शाळांच्या परिसरात मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. वास्तविक शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेच्या 100 मीटरच्या परिसरात पार्किंगला बंदी आहे. शालेय बस धोरण आणि मोटार वाहन कायद्या अंतर्गत हा नियम अस्तित्वात असूनही शाळांच्या वेळेत शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ कार, ऑटो-रिक्षा आणि दुचाकींसारखी खाजगी वाहने नियमितपणे पार्क केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच मुलांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. मुलांचे अपहरण करण्याच्या घटना वाढल्या आहेत, याकडे लक्ष वेधत स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी परिवहन आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना 100 मीटरच्या आत ‘नो-पार्किंग’ नियमाची कठोर अंमलबजावणी करावी, मुलांना आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी केवळ अधिकृतपणे नोंदणीकृत शालेय बसेसनाच परवानगी द्यावी, वाहतूक पोलीस आणि परिवहन प्राधिकरणांकडून नियमित देखरेख ठेवावी आदी मागण्या केल्या आहेत.



























































