मेकअप करताना…रंगांचे महत्त्व जाणून घ्या !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेकअप आर्टिस्ट करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा रंग हा एक प्रमुख पाया आहे. मेकअप करताना आर्टिस्टच्या त्वचेचा टोन ओळखून, त्याप्रमाणे योग्य रंग जुळविण्यासाठी रंगांची समज असणे गरजेचे आहे.

 रंग म्हटले की, आपल्या समोर इंद्रधनुष्याची माळ तयार होते. हे सात रंग ता, ना, पि, हा, नी, पा, जा. लहानपणापासून आपल्या डोळ्यांना सुखावणाऱया या इंद्रधनुष्याचे आपल्या जीवनातही खूप महत्त्व आहे. मेकअपमध्ये तर रंगांशिवाय काहीही करणे अशक्य आहे. जसजसा काळ बदलला तसतसे रंगांचे महत्त्व वाढतच गेले. काळानुरूप, प्रसंगानुरूप बदल घडतच गेले.

उटणी, लेपणाऐवजी, फाऊंडेशन त्यातही लिक्विड, क्रीम, मॅट, शायनी अशा प्रकारचे व प्रत्येकाच्या रंगांचे शेडस् उपलब्ध होऊ लागले. त्वचेनुरूप, वातावरणाला साजेसे प्रकार यात मिळू लागले. पूर्वी मेंहेंदी.  हरडा, हळद, डाळिंब, बीट अशा अनेक झाडांचा, पानांचा, फळांचा वापर त्यासाठी केला जात असे. रंग नसते तर कल्पनाही करू शकत नाही की, आपले आयुष्य कसे झाले असते.  मेकअप करताना रंगांचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे असते. जसकी मूळ रंग, द्वितीय रंग, तृतीय रंग, यांची ओळख त्यांचा अभ्यास असायलाच हवा. कारण फाऊंडेशन, लिपस्टिक, आयशाडो, यांचा वापर करताना रंगांचे ज्ञान असल्यास मेकअप करताना हे रंग निवडताना चूक होणार नाही. रंगांमध्ये लाल, पिवळा, निळा हे अचल रंग असून ते कुठल्याही रंगांपासून तयार होत नाहीत. हे तीन रंग एकमेकांमध्ये मिसळल्यामुळे दुसरे रंग तयार होतात. लाल-पिवळा मिसळल्यामुळे शेंदरी रंग (ऑरेंज), पिवळा-निळा यांच्या मिश्रणाने हिरवा (ग्रीन), लाल-निळापासून जांभळा (व्हॉयलेट) तर या द्वितीय रंगांच्या मिश्रणाने तृतीय रंगांचा जन्म होतो तर द्वितीय रंगांमधील कोणत्याही दोन रंगांमुळे तृतीय रंग संगती तयार होते.

यामध्ये तांबडा हिरवा रंग मिसळल्यास तांबडा करडा रंग तयार होतो. लाल रंगात काळा रंग जर मिक्स केला तर तपकिरी रंग तयार होतो. लाल रंगात पांढरा रंग मिक्स केला तर गुलाबी रंग तयार होतो. काळय़ा रंगात पांढरा रंग मिक्स केला तर करडा रंग तयार होतो, पण अनेकवेळा काळा किंवा पांढऱया रंगाचे मिश्रण कमी जास्त केल्यामुळे वेगवेगळय़ा लाईट किंवा डार्क शेड तयार होतात आणि या सगळय़ाचा डोळय़ांची रंगभूषा करताना आपल्याला खूप उपयोग होतो.

  • डोळ्यांखालील निळसर काळी वर्तुळ लपविण्यासाठी नारंगी रंगाचे कन्सिलर वापरावे लागते. डोळय़ांचा मेकअप करताना सॉकेट क्रिस तयार करण्यासाठी गडद रंग वापरावे लागतात. तर अनेकवेळा फाऊंडेशनचा वापर करतानादेखील आपल्याला या रंगांचे जर महत्त्व माहीत असेल त्यांची ओळख असेल तर आपण त्याप्रमाणे फाउंडेशनचे, कन्सिलरचे योग्य रंग निवडून चेहऱयावर लावू शकतो. उदाहरणार्थ जर एखाद्याची रुडी स्किन असेल त्याच्या स्किनवर रेड पॅचेस असतील आणि त्याचा टोन रेड टोन असेल तर प्रथम आपल्याला तो टोन डाऊन करून घ्यावा लागेल आणि त्यासाठी ग्रीन कलरचा वापर करावा लागेल. कलर व्हीलप्रमाणे रेडचा अपोजिट ग्रीन कलर आहे. त्यामुळे कलर शेडस्च जर ज्ञान  असेल तर आपण त्याप्रमाणे त्या रंगांची निवड करू शकतो.
  • अनेक वेळा लिपस्टिक्स आपल्याला वेगवेगळय़ा शेडच्या हव्या असतात आणि त्या जर आपल्याकडे उपलब्ध नसतील तर त्याप्रमाणे आपल्याला त्या शेडस् तयार करायच्या असतात. रंगांचे मिश्रण करून आपल्याला पाहिजे त्या लिपस्टिकचा रंग तयार करू शकतो. चित्रकाराप्रमाणे मेकअप आर्टिसलादेखील रंगांचे वेगवेगळय़ा पद्धतीने मिश्रण करून ते चेहऱयावर वापरता आले पाहिजेत.
  • आपली नजर नेहमी उजळ रंगाकडे खेचली जाते. म्हणूनच उजळ रंग हे हायलाईट करण्यासाठी वापरतात, तर डार्क रंगांनी शाडो तयार होते. उदाहरणार्थ हनवटीखाली डार्क रंगांचा वापर केल्यास डबल चीन कमी झालेली भासते तर चीकबोन्स खाली डार्क रंगाची शेडिंग दिल्यास तिथे शेडिंग असल्यामुळे एक प्रकारची खोली निर्माण होते व चेहरा निमुळता वाटतो.
  • रंगमंचावर, चित्रपटात, एखादी भूमिका साकार करताना अनेक रंगांचा वापर केला जातो. त्यातही ती भूमिका पॅरेक्टर म्हणून दाखवायची असेल तर भूमिकेनुसार रंगांचा वापर करावा लागतो. योग्य रंगांच्या वापराने भूमिका जिवंत भासते. रंगसंगतीची जाण  मेकअप आर्टिस्टला असणे गरजेचे असते. योग्य रंग वापरून केलेल्या रंगांमुळे मेकअप चेहऱयाशी एकरूप होतो आणि त्यामुळे चेहरा आकर्षक दिसतो.

– शिवानी गोंडाळ, मेकअप आर्टिस्ट