अरे वाह! चार दिवस काम, तीन दिवस सुट्टी
जपान सरकार कामगारांच्या भल्यासाठी एक खास योजना घेऊन यायच्या तयारीत आहे. कामगारांसाठी चार दिवसांचा कामकाज आठवडा केला जाणार आहे. म्हणजे फक्त चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी. मजुरांची कमतरता दूर करणे हा यामागचा उद्देश आहे. जपान सरकारने 2021 मध्ये पहिल्यांदाच चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवडय़ाचा विचार सुरू केला होता. मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात यायला विलंब झाला. जपानच्या आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालयाच्या मते, देशातील फक्त 8 टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचाऱयांना आठवडय़ातून तीन किंवा अधिक दिवस सुट्टी देतात, तर 7 टक्के कंपन्या फक्त एक दिवस सुट्टी देतात.
24 तासांमध्ये फक्त 30 मिनिटांची झोप, जपानी व्यक्तीची जगभर चर्चा
जपानमधील एक व्यक्ती गेल्या 12 वर्षांपासून दररोज फक्त 30 मिनिटे झोपते. डायसुके होरी नावाच्या 40 वर्षीय व्यक्तीचे म्हणणे आहे की, त्याने आपले शरीर आणि मन अशा प्रकारे प्रशिक्षित केले आहे की, त्याला अधिक झोपेची गरज नाही. काम करण्याची क्षमता वाढविण्यासाठी त्याने हे केले. सामान्य व्यक्तीने दररोज 6 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे असते. त्यामुळे मन आणि शरीराचा थकवा दूर होऊन दुसऱया दिवसासाठी तयार होण्यास मदत होते. डायसुके होरीने मात्र आता या म्हणण्याला छेद दिला आहे. होरीला 12 वर्षांपूर्वी कमी झोपण्याची सवय लागली होती. 2016 मध्ये त्याने जपान शॉर्ट स्लीपर्स ट्रेनिंग असोसिएशनची सुरुवात केली. येथे तो लोकांना आरोग्य आणि झोपेशी संबंधित क्लासेस देतो. आतापर्यंत त्याने 2100 विद्यार्थ्यांना कमी वेळ झोपूनही निरोगी राहण्याची युक्ती शिकवली आहे. जोपर्यंत तुम्ही खेळ आणि व्यायाम करत आहात तोपर्यंत कोणतीही अडचण येणार नाही, असे होरीने सांगितले.
पायलटवर विंडस्क्रीन स्वच्छ करण्याची वेळ
पाकिस्तानी पायलटवर विमानाची विंडस्क्रीन स्वच्छ करण्याची वेळ आली. उड्डाण करण्यापूर्वी पायलटने विंडस्क्रीन स्वच्छ करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी विमान कंपनीचा पायलट हाताने विंडस्क्रीन साफ करताना दिसत आहे. विंडस्क्रीन साफ करण्यासाठी एक एअर पायलट विमानाच्या खिडकीतून बाहेर वाकून विंडस्क्रीन साफ करत आहे. या व्हिडीओचा नेटिजन्सनी चांगलाच समाचार घेतला.
प्रसिद्ध उद्योगपतीचा डोंगरावरून पडून मृत्यू
ऑडी इटलीचे मालक आणि गिर्यारोहक फॅब्रिझियो लाँगो यांचा डोंगरावरून 10,000 फूट उंचीवरून खाली पडून मृत्यू झाला आहे. फॅब्रिझियो लाँगो हे इटली-स्विस सीमेजवळील माउंट एडेमेलो पर्वतावर चढत असताना ते खाली कोसळले. अपघाताच्या वेळी ते शिखराच्या अगदी जवळ होते. लाँगो पडल्यानंतर एका सहकारी गिर्यारोहकाने बचाव पथकाला याबाबतची माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. लाँगो यांचा मृतदेह 700 फूट खोल दरीत सापडला.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन मंगोलिया दौऱयावर
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सोमवारी रात्री दोन दिवसांच्या दौऱयावर पोहोचले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने पुतीन यांना अटक करण्याचे आदेश मंगोलियन सरकारला दिले होते. परंतु मंगोलियन सरकारने पुतीन यांना अटक करण्याऐवजी सरकारचा प्रतिष्ठत गार्ड ऑफ ऑनर पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुतीन यांचे आयसीसीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून राजधानी उलानबाटारमध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.