जगभरातून महत्वाच्या घडामोडी

 दक्षिण कोरियाकडे अपाचे हेलिकॉप्टर

अमेरिका दक्षिण कोरियाला 36 एएच-64ई अपाचे अॅटॅक हेलिकॉप्टरची विक्री करणार आहे. 3.5 बिलियन डॉलरच्या या समझोत्यामध्ये दक्षिण कोरियाला मिसाईलसह अन्य शस्त्रास्त्रsसुद्धा मिळणार आहेत. दक्षिण कोरियाच्या हवाई दलाची पॉवर आता वाढणार असल्यामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची डोकेदुखी वाढणार आहे. या डीलमुळे अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध आणखी दृढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोरिया सध्या उत्तर कोरियाच्या आक्रमकतेचा सामना करत  आहे. अमेरिकेच्या मदतीने आता दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाकडून होणारे हल्ले रोखण्यास मदत मिळू शकते.

अबुधाबीत ड्रोन स्पर्धा; कोटय़वधींचे बक्षीस

कार, मोटरसायकल आणि घोडय़ांच्या धावण्याची स्पर्धा सर्वांना माहिती आहे. परंतु आता अबुधाबीत अत्याधुनिक ड्रोनची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येणार असून यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेला ‘ऑटोनोमस रेसिंग लीक’ असे नाव देण्यात आले आहे. या स्पर्धेत जगातील टॉप टीम सहभागी होतील. ज्यात रिसर्च  इंस्टिटय़ुशन्स, इनोव्हेटर्स एडवांस टेक्नोलॉजी स्किल्स दाखवता येऊ शकतील. ही स्पर्धा जिंकणाऱ्यास 1 मिलियन डॉलर म्हणजेच 8 कोटी 38 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. या वर्षी ड्रायव्हरलेस कारची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

अमेरिकेत हिंदुस्थानी डॉक्टरला अटक

अमेरिकेत एका 40 वर्षीय हिंदुस्थानी डॉक्टरला अटक करण्यात आली. छोटी मुले आणि महिलांचे नग्न व्हिडीओ व फोटो काढल्याचा या डॉक्टरवर आरोप आहे. या डॉक्टरचे नाव उमर एजाज असे आहे. डॉक्टरने रुग्णालयातील बाथरूम, चेजिंग रूम आणि अन्य ठिकाणी कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्याद्वारे तो महिलांचे कपडे बदलतानाचे पह्टो आणि व्हिडीओ चोरून काढायचा. एजाजने अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. या डॉक्टरकडे जवळपास 13 हजार व्हिडीओ आहेत.

ब्राझील नौदलाचे कमांडर हिंदुस्थानात

ब्राझील नौदलाचे कमांडर एम.एस. ऑलसेन सध्या हिंदुस्थान दौऱ्यावर आहेत. ऑलसेन यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय वॉर मेमोरियल येथे जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी त्यांनी हिंदुस्थानी नौदलाचे प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नौदल प्रमुखांमध्ये विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. हिंदुस्थान आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये समुद्र सहकार्य वाढवण्यासाठी ऑलसेन यांचा हा हिंदुस्थान दौरा आहे. ऑलसेन हे मुंबई दौऱ्यावरसुद्धा येणार आहेत.

जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे निधन

जगातील सर्वात वयोवृद्ध महिला मारिया ब्रान्यास यांचे निधन झाले. त्या 117 वर्षे 168 दिवसांच्या होत्या. 2023 मध्ये फ्रान्सच्या नन लुसिल रँडन यांच्या मृत्यूनंतर त्या जगातील सर्वात वयोवृद्ध बनल्या होत्या. मारिया ब्रान्यास या उत्तर पूर्वी स्पेन येथील ओलोट शहरात राहत होत्या. मारिया यांचा जन्म 4 मार्च 1907 रोजी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथे झाला. 1914 मध्ये त्या स्पेनला परत आल्या. गिरोना येथील एका रुग्णालयात आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पश्चात दोन मुली आहे.