बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा रेल्वे सेवा सुधारा, शिवसेनेची जोरदार मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नागपूर

शिवसेनेचा विकासाला विरोध नाही पण या विकासामुळे जर विनाश होणार असेल तर त्याला कायम विरोध राहील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींवरून बुलेट ट्रेन नेण्याला शिवसेनेचा कायम विरोध राहणार असून सरकारने आधी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणारी रेल्वे सेवा सुधारण्याला प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी आज शिवसेना आमदारांनी विधानसभेत केली.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेवर बोलताना आमदार सुनील प्रभू यांनी या मागण्यांमध्ये बुलेट ट्रेनसाठी झालेल्या तरतुदीला जोरदार विरोध केला. बुलेट ट्रेनमुळे पालघर जिह्यातील शेतकऱ्यांची २५० हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी घेतली जाणार आहे. तेथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीक्र विरोध असून शिवसेनेचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा सरकारने आधी राज्यातील उपनगरीय रेल्वे सेवा सुधारण्याची आवश्यकता आहे. आजही रेल्वे सेवा सुधारलेली नाही. तेव्हा बुलेट ट्रेनचा निधी तिकडे वळवावा, अशी मागणी प्रभू यांनी केली.

नाणारमुळे निसर्गाची हानी
नाणार प्रकल्पामुळे येथील मासेमारीचा ऱ्हास होणार आहे. येथील विजयदुर्गच्या खाडीचा विस्तार मोठा आहे. या भागात पाणबुडे पाण्यात डुबकी मारून खडकावर येणारी मासळी पकडत असतात. हा प्रकल्प आल्यास त्यांचाही रोजगार बुडणार आहे. रिफायनरीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे किनारीभागातील मासेमारीच धोक्यात येणार आहेत. या भागातील आंब्याची १२ लाख झाडे तसेच लाखो काजू आणि नारळाची झाडे. होणारी भातशेती, नाचणी, कुळीथ तसेच भाजीपाला या सर्वांचेच नुकसान होणार आहे. कोकणचा ऱ्हास शिवसेना सहन करणार नाही, त्यामुळे शिवसेनेचा या प्रकल्पाला कायम विरोध राहील, असे सुनील प्रभू म्हणाले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडीधारकांचे पुनर्वसन करा!
संजय गांधी राष्ट्रीय उद्यांनातील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन त्याच जागी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचे अचानक मरोळ मरोशी येथे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे झोपडीधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांचे पुनर्वसन २०११च्या सेन्ससप्रमाणे करून त्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोफत घरे द्यावीत. त्यांचे त्याच भागात स्थलांतर करून मोकळ्य जागेत वृक्षलागवड करावी अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली.