जंगल परिसरातील जनावरांना हक्काचा पाणवठा

सामना ऑनलाईन ,सटाणा

दि. 11  – बागलाण तालुक्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईच्या झळा नागरिकांबरोबरच वन्यप्राण्यांनाही बसताना दिसत असून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात थेट मानव वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. यातून अनेक छोटय़ा मोठय़ा दुर्घटना घडून घोटभर पाण्यासाठी प्राण्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. सध्या दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागल्या असून पाण्याचे नैसर्गिक स्त्राsत आटून गेले आहेत. यामुळे नागरिकांबरोबरच वन्यप्राण्यांची ही पाण्यासाठी पायपीठ सुरू झाली आहे. कंधाणे येथील युवकांनी भागडा डोंगर परिसरातील वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होत असलेली फरफट थांबविण्यासाठी या भागात तळे निर्माण करून प्राण्यांच्या पाणवठय़ाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

कंधाणे येथील भागडा डोंगर परिसरात हजारो एकर राखीव जंगलवन क्षेत्र असून यात मोर, तरस, कोल्हे, बिबटय़ा यांचा वावर आहे. या वन्यप्राण्यांची पाण्याची सोय निर्माण करून देण्याची संकल्पना येथील मनोहर बिरारी, शशिकांत बिरारी, ओम गुरूदेव गॅस एजन्सीचे संचालक राकेश घोडे यांनी आपल्या मित्र परिवारा जवळ मांडली. त्यांच्या हाकेला साथ देत ग्रामसेवक संदीप बेडीस, ग्रामसेवक सतिष मोरे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणत कार्यवाहीस सुरुवात केली. येथील डेंगरालगत असलेल्या मनोहर बिरारी यांच्या शेतात तळ्याची निर्मिती केली. यात टँकरने पाणी टाकून प्राण्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे यावेळी कारभारी बिरारी, वनपाल शिरसाठ, प्रफुल्ल पाटील, पशुवैदकीय डॉ. बोरोले, किरण सोनवणे, दिलीप आहिरे, संदीप गुंजाळ उपस्थित होते.

पाणीटंचाईच्या झळा नागरिकांबरोबरच वन्यप्राण्यांनाही बसत आहेत. वन्यप्राण्यांची पाण्यासाठी होत असलेली फरफट पाहाता त्यांना हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तळे निर्मितीची संकल्पना आली. संपूर्ण उन्हाळय़ात पाण्याची सोय केली जाईल अजून बऱयाच वनक्षेत्रात अशा वनतळ्यांच्या निर्मितीचा मानस आहे.     राकेश घोडे, प्राणीमित्र