कर्नाटकातील राज्यपाल थावरचंद गहलोत हे दिवसाढवळ्या पक्षपातीपणे वागत असून ते काँग्रेस नेत्यांविरोधात जाणीवपूर्वक कटकारस्थान करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्यांनी आज केला. कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांविरोधात शनिवारी राजभवनावर मोर्चा काढला. या मोर्चात कर्नाटकमधील अनेक मंत्री सहभागी झाले होते. एच.डी. कुमारस्वामी यांच्या विरोधातील तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे राज्यपालांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याला परवानगी द्यावी. संविधानानुसार, राज्यपालांना हे करावेच लागेल, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले. राज्यपाल गहलोत यांनी एच.डी. कुमारस्वामी यांना पाठीशी घालू नये, अशी मागणीही काँग्रेस नेत्यांनी या वेळी केली.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी राज्यपाल का आग्रही दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांवर खटला दाखल करण्यासाठी राज्यपालांना कोणी आदेश दिले? कारवाई करण्यासाठी तपास पूर्ण झाला का? मुख्यमंत्र्यांवर जे आरोप करण्यात आले आहेत त्याचे अन्य एजन्सीने समर्थन केले आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असूनही राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांविरोधात कारवाई करण्यासाठी का खटाटोप करत आहेत, असा गंभीर आरोप कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी केला. एच.डी. कुमारस्वामी, जनार्दन रेड्डी यांच्यासह अन्य पाच-सहा जणांच्या फायली राज्यपालांच्या टेबलावर धूळ खात पडून आहेत. यावर कारवाई करण्यासाठी राज्यपालांना वेळ मिळत नाही का, असा सवालही खरगे यांनी या वेळी केला.
आम्ही राज्यपालांवर नैतिक दबाव टाकत आहोत. राज्यपालांनी राज्यघटनेला अनुसरून निर्णय घेत एच.डी. कुमारस्वामी यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी कर्नाटकचे मंत्री एच.के. पाटील यांनी केली. राज्यपालांनी पक्षपातीपणा सोडून द्यावा, केवळ भाजपचे प्रतिनिधित्व करू नये, असेही पाटील या वेळी म्हणाले.