नगरमध्ये पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगरच्या पोलीस दलासाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही चाचणी घेण्यात येत आहे. आज पहिल्या दिवशी चालक संवर्गातील 418 उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट देऊन भरती प्रक्रियेची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या.

राज्यात सुमारे 14 हजार जागांसाठी भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. नगर जिल्हा पोलीस दलातील 139 जागांसाठी 12 हजार 224 अर्ज दाखल झालेले आहेत. आता  प्रत्यक्ष मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात झालेली आहे. 2 ते 14 जानेवारीदरम्यान येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस शिपाई पदाच्या 129, तर चालक पदाच्या 10 जागांसाठी ही भरती होत आहे. आज पहिल्या दिवशी चालक संवर्गातील उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यासाठी 330 पुरुष, 30 महिला आणि 88 माजी सैनिक उमेदवारांना बोलाविण्यात आलेले होते. आज आणि उद्या पोलीस चालक पदाच्या 10 जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर 4 ते 14 जानेवारीदरम्यान पोलीस शिपाई पदाच्या 129 जागांसाठी मैदानी चाचणी पार पडणार आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, अपर अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली 386 अधिकारी-अंमलदारांचा बंदोबस्त भरती प्रक्रियेसाठी तैनात करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर होणाऱया चाचणीसाठी पहाटे पाच वाजता उमेदवारांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. संपूर्ण मैदानी चाचणीवर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. मैदानी चाचणी ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.