टंचाईग्रस्त नडगावात लागले जिवंत झरे; शहापुरात भूगर्भ शास्त्रज्ञांना पाचारण, बघ्यांची एकच गर्दी

पाणीटंचाईग्रस्त म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरवाडी येथे कोरड्या जमिनीत अचानक पाण्याचे धो धो झरे वाहू लागले आहेत. पाणीटंचाईच्या भागात अशी घटना घडल्याने टंचाईने होरपळत असलेल्या गावकऱ्यांची घटनास्थळी धाव घेऊन पाण्याच्या झऱ्याचे व्हिडीओ व्हायरल करत केले. शिवाय यासंदर्भात पाणीपुरवठा विभाग व भूगर्भ शास्त्रज्ञांनाही कळवण्यात आले आहे.

शहापूर तालुक्यातील नडगाव ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरवाडी येथील दशरथ मुकणे या शेतकऱ्याच्या शेतात रविवारी अचानक पाण्याचे झरे वाहू लागले. तर आज सोमवारीदेखील अन्य ठिकाणी पाण्याचे प्रवाह आढळून आले. नडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस. जी. वेखंडे यांनी शहापूर तहसीलदारांना यासंदर्भातील माहिती दिली. या अनपेक्षित घटनेमुळे स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये भीती, आश्चर्य आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील ग्रामस्थ हा नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी घटनास्थळी धाव घेत असून या भागात यापूर्वी कधीही असा पाण्याचा उगम दिसन आला नव्हता.

उपसा करूनही पाणी थांबेना !
मशीनद्वारे पाणी उपसूनही पाणी कमी होत नसल्याने यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी यांनी दिली.