
देशातील विमान प्रवास अलीकडच्या काळात प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करू लागला आहे. तांत्रिक बिघाड, खराब हवामानाची स्थिती, पक्ष्यांची धडक बसून इमर्जन्सी लॅण्डिंग अशा कारणांमुळे विमान प्रवासाबाबत भय वाढले आहे. देशात गेल्या पाच वर्षांत 53 हवाई अपघाताच्या घटना घडल्या असून त्यात अहमदाबादमधील भीषण अपघाताचा समावेश आहे. या अपघातांमध्ये 320 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, तर 180 हून अधिक लोक जखमी झाले.
हवाई प्रवास एकेकाळी अधिक सुरक्षित मानला जायचा. मात्र अलीकडच्या काळात विविध पंपन्यांची विमाने आणि विमानतळांची संख्या वाढल्यानंतर हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातामुळे हवाई प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा चिंतेचा विषय बनला आहे. विमानांच्या टेक ऑफ आणि लॅण्डिंगपूर्वी सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असते. त्यादृष्टीने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(डीजीसीए), एअर ट्रफिक पंट्रोल (एटीसी) आणि वैमानिक यांच्यात समन्वय साधण्याचे काम अत्यंत महत्त्वाचे असते. यात होणारी छोटीशी चूक मोठय़ा अपघाताला कारणीभूत ठरत आहे. गेल्या पाच वर्षांतील अपघातांच्या आकडेवारीमुळे असुरक्षिततेची भावना वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे. 2020 ते 2025 या कालावधीत झालेल्या 53 अपघातांपैकी 20 अपघातांमध्ये जिवीतहानी झाली. माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, पाच वर्षांत नागरी विमान अपघातांचे प्रमाण 14.29 टक्क्यांनी वाढले. बहुतेक घटनांमध्ये लहान विमाने, प्रशिक्षित उड्डाणे, हेलिकॉप्टर, चार्टर्ड जेटचा समावेश होता.
खराब हवामानामुळे खूप अडचणी येतात!
विमानाच्या लॅण्डिंगदरम्यान हवामानाची स्थिती चांगली असणे आवश्यक असते. खराब हवामान असेल तर विमान धावपट्टीवर उतरवत असताना वैमानिकाला खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. कमी दृश्यमानता असेल तर धावपट्टी स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे वैमानिकाला धावपट्टीचा नेमका अंदाज येत नाही. बारामतीतील अपघातग्रस्त विमानाच्या वैमानिकाने अशाच आव्हानात्मक स्थितीचा सामना केला असावा. बारामतीचे विमानतळ उंच भागावर आहे. अशा भागात विमानाचे लॅण्डिंग करणे मोठे आव्हान असते. छोटय़ा-छोटय़ा ढगांमुळे वैमानिकाने धावपट्टीआधीच लॅण्डिंगचा प्रयत्न केला असावा. खोल खड्डय़ात लॅण्डिंगचा अंदाज चुकल्याने अपघात घडला असावा.
n डॉ. विपुल सक्सेना, हवाई वाहतूक तज्ञ
सुरक्षित लॅण्डिंग करणे वैमानिकांसाठी आव्हान
अपघाताच्या दोन भागांत वर्गवारी होते. एक म्हणजे ‘इन्सिडेंट’(घटना) आणि दुसरा ‘ऑक्सिडेंट’(अपघात). ‘इन्सिडेंट’च्या प्रवर्गात टायर पंक्चरसारख्या छोटय़ा घटनांचा समावेश होतो. बारामतीतील वैमानिक कमी दृश्यमानतेमुळे 500 मीटर अंतरावरील चित्र स्पष्टपणे पाहू शकत नव्हता. सरकार, डीजीसीए, विमान उत्पादक आदी सर्व घटक हवाई प्रवासाच्या सुरक्षेची खबरदारी घेतात. सारख्याच चुकीमुळे पुन्हा तसाच अपघात घडू नये याची काळजी घेतली जाते. पक्ष्यांची धडक बसणे यांसारख्या प्रकारांचाही अडथळा असतो. विमानतळाची धावपट्टी नेमकी पुठे आहे, याची माहिती देणारी विशिष्ट प्रणाली असते. छोटय़ा विमानतळांवर ती प्रणाली नसते. त्यामुळे छोटय़ा विमानतळांवर लॅण्डिंग करताना वैमानिकांना धावपट्टीचा अंदाज घेणे मुश्किल बनते.
n जितेंद्र भार्गव, माजी कार्यकारी संचालक, एअर इंडिया





























































