हिंदुहृयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. काही बारीकसारीक गोष्टी बाकी आहेत. जुलै महिनाअखेरपर्यंत त्या पूर्ण होतील. त्या झाल्यावर खरे काम सुरू होईल. शिवसेनाप्रमुखांच्या जीवन प्रवासाबाबत अनेक बाबी करायच्या आहेत, त्याला सुरुवात केली जाईल. ऑगस्टपासून स्मारकाच्या आतील डिस्प्लेचे काम सुरू होणार असून 23 जानेवारी 2025 पर्यंत स्मारकाचे लोकार्पण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जागतिक दर्जाचे राष्ट्रीय स्मारक दादरमधील शिवाजी पार्क येथे उभे राहत आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्मारकाला भेट देऊन कामाची पाहणी केली तसेच संबंधित अधिकऱ्यांशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला. शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम आणि कामाचे विविध टप्पे तज्ञ वास्तूविशारदांच्या देखरेखीखाली सुरू आहेत. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, भुपाल रामनाथकर उपस्थित होते.
बाळासाहेबांचे फोटो, भाषणे, आठवणी, लेख आणून द्या!
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व नागरिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना आवाहन केले.
स्मारकामध्ये शिवसेनाप्रमुखांचे फोटो, भाषणे, आठवणी, लेख मांडले जाणार आहेत. त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे बाळासाहेबांचे फोटो, भाषणे, बातम्या, आठवणी, लेख असतील त्यांनी ते शिवसेना भवन किंवा स्मारकाच्या ठिकाणी आणून द्यावेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान, ज्या ज्या व्यक्ती बाळासाहेबांच्या सान्निध्यात होत्या त्यांच्या उल्लेख बाळासाहेबांच्या स्मारकात करण्यात येईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
स्मारकाच्या कामाबद्दल समाधानी
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे काम अखंडपणे सुरू आहे. टाटा प्रोजेक्ट लिमिटेड आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनासाठी स्मारकाचे काम अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे. स्मारकाच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.