
विटस् हॉटेल खरेदी प्रकरणात अडचणीत सापडलेले शहा सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. शिरसाट यांच्या मालमत्तेत पाच वर्षांत 12 पट वाढ झाल्याबाबत नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्राद्वारे दाखवलेली संपत्ती आणि 2024 च्या निवडणुकीत दाखवलेली संपत्ती यामध्ये तब्बल 12 पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे. पाच वर्षांत तुमची संपत्ती एवढी वाढली कशी, अशी विचारणा आयकर विभागाने नोटीस बजावत शिरसाट यांना केली आहे. या नोटिसीला 9 जुलै रोजी उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, शिरसाट यांनी उत्तर देण्यास आपण वेळ वाढवून घेतल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिरसाट कुटुंबीय वादाच्या भोवऱ्यात
मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याच्यावर विवाहित महिलेने केलेले आरोप, हॉटेल विट्स खरेदी प्रकरण, एमआयडीसीतील प्लॉट, शहरालगत सरकारी वर्ग दोनची जमीन कुटुंबीयांच्या नावावर खरेदी केल्याचा आरोप तसेच शहर आणि परिसरात पंधरा एकर जमीन आणि प्लॉट खरेदी केल्याचा आरोपांमुळे शिरसाट कुटुंबीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
3 कोटींवरून 33 कोटी संपत्ती
संजय शिरसाट यांची पाच वर्षांच्या कालावधीत संपत्ती 3 कोटी 31 लाखांवरून तब्बल 33 कोटी 3 लाखांवर गेली आहे. त्यांच्याकडे 44 लाख 78 हजार रोकड आहे. याशिवाय 4 कोटी 37 लाख रुपये किमतीची शेतजमीन, 4 कोटी 70 लाख रुपयांचे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर शहरात फ्लॅट आहेत. पत्नीच्या नावे 63 लाख 98 हजार रुपये किमतीची जमीन आणि 5 कोटी 65 लाख 55 हजार 980 रुपये किमतीचे फ्लॅट आहेत. पत्नीच्या स्थावर मालमत्तेची किंमत 19 कोटी 65 लाख 32 हजार 15 रुपये इतकी आहे. संजय शिरसाट यांच्याकडे पत्नीच्या नावे 18 लाख 500 रुपये किमतीची कार आहे. सोन्याचे दागिने आणि एलआयसी, विविध बँकांतील ठेवी अशी एकूण 13 कोटी 37 लाख 88 हजार 472 रुपयांची गुंतवणूक आहे.
श्रीकांत शिंदेंनाही नोटीस?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस आली आहे. संजय शिरसाट यांनीच ही माहिती दिली.