
शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयासह घरावर आयकर विभागाने मंगळवारी सकाळी छापे टाकले. कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या आयसीसी टॉवरमधील कार्यालयात तसेच सिंध सोसायटी येथील निवासस्थानी छापा टाकण्यात आला. त्याचबरोबर मित्तल ग्रुपच्या बंडगार्डन भागातील कार्यालयावर छाप्याची कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छापामारीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
पुण्यात आयकर विभागाच्या धडक कारवाईमुळे आणि छापेमारीमुळे बांधकाम क्षेत्रासह व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईचे संपूर्ण सत्य समोर येणार आहे. दोन्ही नामांकित बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा पडल्यामुळे अनेकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. यापूर्वी मुंबईतील ऑनेस्ट शेल्टर्स एलएलपी प्रकल्पासंदर्भात ईडीने मित्तल ब्रदर्स ग्रुपची चौकशी केली होती.































































