
मध्य रेल्वेच्या हार्बर एसी लोकलला उत्पन्न मिळत नसल्याने ती बंद करीत उद्यापासून कल्याण-टिटवाळा-बदलापूर सेक्शनमध्ये तिच्या आधारे वाढीव फेर्या चालविण्यात येणार आहेत. मुख्य मार्गावर 44 ऐवजी 56 एसी फेर्या धावणार असून साध्या लोकलची संख्या तेवढीच कमी होणार असल्याने मध्य रेल्वेची कसोटी लागणार आहे.
एसी लोकलच्या एकेरी प्रवासाच्या भाड्यात 5मेपासून निम्म्याने दरकपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाढता प्रतिसाद पाहून मध्य रेल्वेने मुख्य मार्गावरील एसी लोकलच्या फेर्या वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हार्बर मार्गावरील एसी लोकल प्रतिसादाअभावी बंद करीत मुख्य मार्गावरील फेर्यात 12ने वाढ केली आहे. रविवारी आणि बँक हॉलिडेच्या दिवशीही एसी लोकलच्या 14 फेर्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे हार्बरच्या एसीचा पास काढलेल्या प्रवाशांना रिफंड देण्यात येणार आहे.
हार्बरवरील प्रवाशांची निराशा
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एसी लोकलच्या फेर्यांत जरी वाढ झाली असली रोजच्या एकूण फेर्या आधीप्रमाणे 1810 इतक्याच राहणार आहेत. हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल-गोरेगाव उद्यापासून 16 एसी लोकलऐवजी साध्या लोकल चालविण्यात येतील. सीएसएमटी ते गोरेगाव एसी लोकलला बंद करायला नको होते. तिला नंतर प्रतिसाद वाढला असता असे प्रवाशांचे म्हणणे आहे. हार्बरवरील वातानुकूलित सेवेचा पर्याय भविष्यात आणखी गाड्या आल्यावर विचारात घेण्यात येईल असे रेल्वेचे म्हणणे आहे.
टॉप तिकीट विक्री स्थानके (1 ते 10 मे )
मध्य रेल्वे
सीएसएमटी – 5507
डोंबिवली- 5373
ठाणे – 4548
कल्याण- 4604
घाटकोपर-2580
पश्चिम रेल्वे
विरार – 5318
बोरीवली – 4122
चर्चगेट – 3976
वसई – 3423
दादर – 3029























































