मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली, बळीराजा सुखावला!

धाराशिव, बीड, लातूर जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात पाण्याची आवक वाढल्याने बळीराजा सुखावला आहे. मांजरा पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याने धरणातील पाणीपातळी वाढत आहे. शाखा अभियंता सूरज निकम यांनी ही माहिती दिली. आज सकाळी 6 वाजता धरणात 0.09 टक्के पाणीसाठा झाला आहे.

सध्या मांजरा धरणात 0.607 दलघमी पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे परिसरातील नागरीक समाधान व्यक्त करत आहेत. धरण परिसरात व पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरवातीपासूनच पाऊस पडत आहे. त्यामुळे जमिनीवर हिरवा शालू पसरला आहे.

कळंब तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, धारूर, लातूर या शहरांची तहान या हे धरण भागवते. तसेच कळंब, केज, अंबाजोगाई, लातूर या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण या धरणावर अवलंबून आहे. असाच पाऊस सुरू राहिला तर यावर्षी धरण भरेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संततधारेमुळे सोयाबीन पिवळे

गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे प्रमुख पिक सोयाबीन पिवळे पडत आहे. जर दोन दिवसात सूर्य दर्शन झाले नाही तर सोयाबीन पिक हातून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मांजरा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या वरच्या भागातील मांजरा नदीवरील महासांगवी मध्यम प्रकल्प ता. पाटोदा 100 टक्के भरले असून त्यामधील विसर्गाने संगमेश्वर मध्यम प्रकल्प ता. भूम 30 टक्के क्षमतेने भरला आहे. यामुळे महासांगवी धरणाचे विसर्जित पाणी संगमेश्वर प्रकल्पात येते. यामुळे संगमेश्वर प्रकल्प लवकरच भरून मांजरा धरणात आवक वाढणार आहे. त्यामुळे यावर्षी मांजरा धरण लवकर भरण्याची शक्यता असल्याचे शाखा अभियंता सूरज निकम यांनी सांगितले.

मांजरा प्रकल्प धनेगाव पाणीपातळी तपशील
गुरुवार
वेळ :- 6:00 वाजता
पाणीपातळी :- 635.73 मी./642.37 मी.
एकूण पाणीसाठा दलघमी = 47.282/224.093
मृत साठा दलघमी =47.130/47.130
जिवंत साठा दलघमी =0.152/176.963
जिवंत पाणीसाठा टक्केवारी : 0.09 %
आवक दलघमी =0.607/6.442
आवक दर =7.03 क्यूसेक्स /248.22 क्यूसेक्स