तामिळनाडूमध्ये आरक्षण 78 टक्क्यांपर्यंत होते. महाराष्ट्रात 75 टक्क्यांपर्यंत का होऊ शकत नाही? केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करून आरक्षण मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत वाढवावी. आम्ही याबाबत त्यांना पाठिंबा देऊ. यामुळे मराठा समाजासह सर्व समाजघटकांचे प्रश्न सुटू शकतात, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मांडली.
शरद पवार यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत आरक्षणासह विविध मुद्दय़ांवर भाष्य केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात आहे. ती चुकीची नाही. मात्र हे करत असताना इतरांना जे मिळते त्याचेही रक्षण करणे आवश्यक आहे. सध्या देशात आरक्षण मर्यादा 50 टक्के आहे. ती मर्यादा 75 टक्क्यांपर्यंत गेली तरी चालेल. त्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करावी, आम्ही पाठिंबा देऊ, असे शरद पवार यांनी सांगितले.
मुलींवरील अत्याचाराच्या घटना चिंताजनक
महाराष्ट्रात मुलींवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, ही चिंताजनक बाब आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी राज्यातील हे सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेत गुंतले आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या अनेक योजना थंडावल्या आहेत. कित्येक रुग्णालयांना सरकारकडून निधी मिळालेला नाही. कॅन्सर रुग्णालयासह इतर रुग्णालयांचे 700 कोटी रुपयांचे अनुदान देणे बाकी आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.