प्रतिकार शक्ती कमी आहे .. कसे ओळखाल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सतत पचनाच्या समस्या जाणवतात
वारंवार सर्दी होत असेल
लगेच थकत असाल
वर्षातून दोनपेक्षा जास्त वेळा तुम्हाला सायनस इनफेक्शन होत असेल
जखमा लवकर भरून येत नसतील
खूप दिवस आजारी पडत असाल
वारंवार फंगल इनफेक्शन होत असेल
वर्षांतून चारपेक्षा जास्त वेळा कानाचे इनफेक्शन होत असेल
सतत ताणतणाव जाणवत असेल
वारंवार डोळ्यांचे इनफेक्शन होत असेल

सतत पचनाच्या समस्या जाणवतात
रोग प्रतिकार शक्तीचा आणि पोटाच्या समस्यांचा जवळचा सबंध आढळून आला आहे. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार पचनाच्या समस्या होत असतील तर तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखा. सतत पोटात दुखणं, अॅसिडिटीचा त्रास होणं, पोटात गॅस निर्माण होणं, बद्धकोष्ठता, जुलाब हे तुमच्या शरीरात प्रतिकार शक्ती कमी असण्याचं लक्षण आहे. जर अशी लक्षणं वारंवार आढळत असतील तर तुम्हाला इनफेक्शन, ऑटो इम्युन आजार अथवा गंभीर आजारपण होण्याची शक्यता असते. यासाठी यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार सुरू करा.

वारंवार सर्दी होत असेल
वारंवार सर्दी, खोकला होणं हे प्रतिकारशक्ती कमी असल्याचं लक्षण आहे. कारण याचा अर्थ तुमचे शरीर बाहेरील जीवजंतूशी लढा देण्यासाठी सक्षम नाही. मात्र एकदा सर्दी- खोकला झाला तर लगेचच घाबरून जाऊ नका. कारण असं व्हायरल इनफेक्शन वर्षांतून एकदा कुणालाही होऊ शकतं. जर तुम्हाला दर आठ-दहा दिवसांनी सर्दी खोकला होत असेल तर याबाबत वेळीच सावध व्हा आणि त्यावर योग्य उपचार करा.

तुम्ही नेहमी लगेच थकत असाल
तुम्हाला थकवा, अंगदुखी, अशक्तपणा जाणवण्याची अनेक कारणं असू शकतात. मात्र यामागचं महत्त्वाचं कारण प्रतिकार शक्ती कमी असणं हेही असू शकतं. रोग प्रतिकार शक्ती कमी असण्यामुळे सांधे सतत दुखतात, वारंवार पोट बिघडतं अथवा भूक मंदावते. या लक्षणांवरून शरीराला प्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे हे ओळखा. कारण अशक्तपणा अंगावर काढणं तुम्हाला महागात पडू शकतं.

वर्षातून दोनपेक्षा जास्त वेळा सायनस इनफेक्शन होत असेल
यामागचं कारण शरीरात प्रतिकार शक्ती कमी असणं हेही असू शकतं. कारण शरीरात रोगांचा आणि विषाणूंचा सामना करणाऱ्या रोग प्रतिकारक पेशी कमी झाल्यास सायनसचा त्रास जाणवू शकतो. यासाठी शरीरातील रोग प्रतिकारक पेशींच्या वाढीसाठी पुरेसे प्रयत्न करायला हवे.

तुमच्या जखमा लवकर भरून येत नसतील
जखमा भरून काढण्यासाठी आपल्या शरीरात एक प्रकारची यंत्रणा असते. ज्यामुळे योग्य उपचार केल्यावर शरीर स्वतःच या जखमा भरून काढते. मात्र जर तुमच्या साध्या कापणे, चिरणे, भाजणे अशा छोट्या-मोठ्या जखमा पटकन बऱ्या होत नसतील तर तुमच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्तीचा अभाव असू शकतो. कारण शरीराला कोणतेही आजारपण, इनफेक्शन, जखम भरून काढण्यासाठी निरोगी प्रतिकार शक्ती असलेल्या पेशींची गरज असते. जेव्हा तुमची प्रतिकार शक्ती कमी होते तेव्हा तुम्हाला या समस्या प्रकर्षाने जाणवू लागतात.

खूप दिवस आजारी पडत असाल
साध्या सर्दी खोकल्यामुळेही तुम्ही दोन ते तीन दिवस बेडवरून उठू शकत नसाल अखवा तुम्हाला वांरवार आजारपण येत असेल तर वेळीच सावध व्हा. याला कारणीभूत तुमची कमजोर प्रतिकार शक्ती असू शकते. कारण असं असेल तर साध्या सर्दी खोकल्यामुळेही तुम्हाला अगदी थकल्यासारखं वाटू शकतं. जर तुमची रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तर पावसाळ्यासारख्या पटकन इनफेक्शन होणाऱ्या काळात सावध राहायला हवं. शिवाय वेळीच उपचार करून स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवायला हवी.

वारंवार फंगल इनफेक्शन होत असेल
रोग प्रतिकार शक्ती कमी असण्याचं हे आणखी एक लक्षण आहे. शारीरिक क्रिया सुरळीत न झाल्याने त्वचेचं इनफेक्शन अथवा फंगल इनफेक्शन होऊ शकतं. वारंवार तोंड येणं, अंगावर फंगल इनफेक्शन होणं असे त्रास जाणवत असतील तर यावर उपाय जरूर करा. त्यासोबत प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा.

वर्षांतून चारपेक्षा जास्त वेळा कानाचे इनफेक्शन होत असेल
जर तुम्हाला दर दोन ते तीन महिन्यांनी अथवा वर्षातून चार ते सहा वेळा कानाचे इनफेक्शन होत असेल तर याबाबत वेळीच लक्ष द्या. कारण हेही तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमी असण्याचं एक लक्षण आहे. कारण रोग प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे तुम्ही असे वारंवार एखाद्या इनफेक्शनच्या बळी पडू शकता.

तुम्हाला सतत ताणतणाव जाणवत असेल
घरात अथवा ऑफिसमध्ये ताणतणाव असेल तर याचा परिणाम तुमच्या मनावर आणि शरीरावर दिसून येतो. काही संशोधनानुसार दीर्घ काळ ताण, नैराश्यात असणाऱ्या लोकांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. कारण ताणतणावामुळे तुमच्या शरीरात हॉर्मोनल बदल होतात, त्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींवर याचा चुकीचा परिणाम होतो. या पेशी तुमच्या शरीराचे इनफेक्शन आणि आजारापासून रक्षण करत असतात.

जर तुम्हाला वारंवार डोळ्यांचे इनफेक्शन होत असेल
जेव्हा तुम्हाला ऑटो इम्युन आजारांचा सामना करावा लागतो. तेव्हा तुमच्या शरीरातील विविध अवयवांवर याचा चुकीचा परिणाम दिसू लागतो. कान, नाक याप्रमाणेच डोळयांचेही इनफेक्शन यामुळे सतत जाणवते. यामुळे डोळे कोरडे होतात, धुरकट दिसू लागते. जर तुम्हाला अंधुक दिसत असेल. डोळे लाल होत असतील अथवा डोळ्यांमध्ये सतत जळजळ जाणवत असेल तर तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याची तुम्हाला गरज आहे.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोषक आणि संतुलित आहार घ्या, पुरेसा आराम करा, पोटाचे आरोग्य चांगलं राहील याची काळजी घ्या, ताणतणावापासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करा. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य निदान आणि उपचार घ्या. कारण रोग प्रतिकार शक्ती ही तुमच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्याची किल्ली आहे. त्यामुळे तुम्ही याबाबत वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.