
सामना ऑनलाईन, ठाणे
वादग्रस्त विधाने करून सतत स्वतःला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गटाला ठाण्यात गळती सुरू झाली आहे. आव्हाड यांचे खंदे समर्थक समजले जाणारे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी स्थायी समितीचा राजीनामा देऊन सर्वप्रथम जोरदार राजकीय भूकंप केला. त्यातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सावरत नाहीत तोच आज ठाणे शहर जिह्याचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अब्दुल शेख (बाटा) यांनी राजीनामा दिला, तर त्यांची पत्नी नगरसेविका हसिना शेख यांचे राजीनामा पत्रही तयार आहे. एकामागून एक राजीनामा सत्र सुरू झाल्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलह चव्हाटय़ावर आला आहे. या सर्व घडामोडींमागे आव्हाड यांचा मनमानी कारभार असल्याचा आरोप होत असून त्यामुळे कालपरवापर्यंत त्यांच्या मागेपुढे करणारे समर्थक आता त्यांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने संघटना मजबूत करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये शहराध्यक्ष व विरोधी पक्षनेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यामधून नगरसेवक नजीब मुल्ला यांना डावलण्यात आले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुल्ला व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद सुरू होता. अखेर त्यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा देऊन आपली नाराजी व्यक्त केली. वास्तविक नजीब मुल्ला हे आव्हाड यांचे खास समजले जातात. बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणातून मुल्ला यांना बाहेर काढण्यासाठी आव्हाड यांनी खूप आटापिटा केला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये अनेक खटके उडत आहेत. आपल्याला प्रत्येक वेळी डावलण्यात येत असल्याची खंत नजीब यांनी याआधीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. नजीब मुल्लानंतर अल्पसंख्याक विभागाचे अजीज शेख यांनीही उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
– ठाण्यात विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड या त्रिकोणाभोवतीच राष्ट्रवादीचे राजकारण फिरत होते. त्यापैकी वसंत डावखरे यांच्या निधनानंतर तो गट आव्हाडांच्या गटात सामील झाला.
– गणेश नाईक यांचे संस्थान नवी मुंबईपुरती जेमतेम शिल्लक असल्याने आव्हाडांनी ठाण्यात पक्षातील आपले वर्चस्व वाढवायला सुरुवात केली.
– एकेकाळी डावखरे गटात असलेले हणमंत जगदाळे हे सध्या कोणत्याही गटात नसले तरी कुणाच्या विरोधातही नाहीत, पण जितेंद्र आव्हाड यांच्या मनमानीविरोधात नजीब मुल्ला यांच्यासह त्यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती.






























































