बेस्टचं ‘नाणं’ खणखणीत! बसमध्ये जमणाऱ्या सुट्या पैशांना वाढती मागणी, कर्मचाऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या डेपोंमध्ये रांगा

>> मंगेश मोरे 

सगळीकडे आर्थिक व्यवहार ‘ऑनलाइन’ झाले आणि बाजारात सुट्या पैशांची प्रचंड चणचण भासू लागली. मात्र बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत सुट्या पैशांचा खणखणाट कायम आहे. दररोज 12 ते 13 लाख रुपयांपर्यंत सुटे पैसे बेस्टकडे जमा होत असून ते  मिळवण्यासाठी बस आगारांत मेट्रो स्थानके, टोलनाके आणि शॉपिंग मॉलच्या कर्मचाऱ्यांसह दुकानचालक व इतर व्यापाऱयांच्या रांगा लागत आहेत. यावरून आर्थिक संकटात असूनही बेस्टचेच ‘नाणं’ आर्थिक राजधानीत खणखणीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कुलाब्यापासून गोराईपर्यंत, तर पूर्व उपनगरात मुलुंडपर्यंत बेस्ट उपक्रमाचे 27 आगार आहेत. या आगारांतून बेस्टच्या 353 आणि भाडेतत्त्वावरील 2331 अशा 2684 बस धावतात. त्यात नव्या 150 एसी इलेक्ट्रिक बसची भर पडली आहे. एसी बसचे किमान भाडे 12 रुपये आहे. त्यामुळे रोख रक्कम देत बसचे तिकीट काढणाऱया प्रवाशांकडून 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी वाहकांच्या बॅगेत जमा होत आहेत. सर्वच आगारांमध्ये अशा नाण्यांचा प्रचंड साठा होत आहे. ही नाणी नोटांमध्ये रूपांतरित करण्याच्या हेतूने बेस्टने सामान्य नागरिक आणि व्यापाऱयांसाठी खुली ठेवली आहेत. 500 रुपयांच्या नोटांच्या बदल्यात सुटे पैसे देताना बेस्ट कुठलेही शुल्क घेत नाही. त्यामुळे सुटय़ा पैशांसाठी रांगा लागत आहेत. त्यांच्यासाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत बेस्टच्या खिडक्या खुल्या ठेवल्या जात आहेत.

काही वर्षांपूर्वी बेस्टचे कर्मचारी सुटय़ा पैशांसाठी मंदिरांच्या ट्रस्टकडे जायचे. आता चित्र बदलले आहे. बाजारात डिजिटल माध्यमांचा वापर वाढल्यानंतर सुटय़ा पैशांसाठी बेस्ट उपक्रम मुख्य स्रोत बनला आहे. एसी बसचे तिकीट दर विषम प्रमाणात असल्याने चिल्लर अधिक जमा होत असल्याचे बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

सुट्य़ा पैशांमध्ये पगार देणे केले बंद

पूर्वी बेस्ट कर्मचाऱयांचा काही पगार नोटांच्या रूपात, तर काही पगार सुटय़ा पैशांमध्ये दिला जायचा. बसफेऱयांमधून जमा होणारी चिल्लर कर्मचाऱयांच्या वेतन वाटपात खर्च व्हायची. मात्र कर्मचाऱयांकडून विरोध झाल्यानंतर सुटय़ा पैशांमध्ये पगार देण्याची प्रथा बंद करण्यात आली. त्यामुळे बेस्टच्या तिजोरीत सुटय़ा पैशांची ‘गंगाजळी’ तयार होत आहे. व्यवस्थापनाच्या मान्यतेनुसार हे सुटे पैसे सध्या नागरिकांच्या माध्यमातून नोटांमध्ये रूपांतरित केले जात आहेत.