डिफेन्स नको, आक्रमक व्हा! पराभवानंतर विराट कोहली फलंदाजांवर भडकला

826

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात झालेला पहिला कसोटी सामना यजमान संघाने 10 विकेट्सने जिंकला. पहिल्या कसोटीमध्ये दोन्ही डावांमध्ये टीम इंडियाचा संघ 200 धावाही करू शकला नाही. न्यूझीलंडच्या धारधार गोलंदाजीसमोर टीम इंडियाचे प्रमुख फलंदाज मैदानात टिकू शकले नाहीत. पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नाराज झाला असून फलंदाजांनी डिफेन्सवर जास्त भर देऊ नये असे म्हटले आहे.

पहिल्या कसोटीमध्ये दारूण पराभवानंतर विराट म्हणाला की, विदेशी खेळपट्ट्यांवर तुम्ही अधिक सावध खेळ करू शकत नाहीत. अति डिफेन्सीव्ह खेळ केल्याचा फायदा कधीच होऊ शकत नाही. तसेच यामुळे तुम्ही आपल्या भात्यातील फटकेही व्यवस्थित खेळू शकत नाहीत. त्यामुळे अति सावध खेळ करण्याऐवजी आक्रमक व्हा, असा सल्ला विराटने टीम इंडियाच्या फलंदाजांना दिला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी अति साधव भूमिका घेतली होती. दुसऱ्या डावामध्ये हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंडपेक्षा मागे असताना मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याने डिफेन्सीव्ह मोडमध्ये जात 81 चेंडूत फक्त 11 धावा केल्या, तर हनुमा विहारी यानेही 79 चेंडू खेळून फक्त 15 धावा फटकावल्या होत्या. एका फलंदाजाने अति सावध भूमिका घेतल्याने दुसऱ्या फलंदाजावर फटकेबाजी करण्याचा दबाव वाढला आणि त्यामुळे आपली विकेटही गमवावी लागली. विराटला फलंदाजांचा हा सावध खेळ आवडलेला नाही. साधव खेळ केल्याने एखादा चांगला चेंडू तुमची विकेट घेऊन जातो आणि संघ संकटात सापडतो, असे विराट म्हणाला.

वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंड विजयी, हिंदुस्थानवर 10 गडी राखून मात

विराट म्हणाला की, जर अशा परस्थितीमध्ये तुम्ही एकही धाव काढली नाही तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही फक्त एखाद्या चांगल्या चेंडूची वाट पाहू शकता आणि तो चेंडू तुमची विकेट्स घेऊन जाईल. तसेच तो पुढे म्हणाला की, मी परिस्थिती पाहतो आणि फलंदाजी करतो. विकेट्सवर गवत असेल तर आक्रमक खेळ करतो. विराटच्या या डोसमुळे आगामी लढतींमध्ये किवी गोलंदाजांवर टीम इंडियाचे फलंदाज तुटून पडतील अशी आशा करायला हरकत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या