#INDvSA कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; राहुलला डच्चू, गिलला संधी

1817

घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची गुरुवारी घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीकडे कर्णधारपद कायम असून अजिंक्य रहाणे उपकर्णधार आहे. विंडीज दौऱ्यात खराब कामगिरी केलेल्या लोकेश राहुलला वगळण्यात आले आहे. संघात शुभमन गिल हा नवीन चेहरा आहे.

विराटच्या ट्वीटमुळे धोनीच्या निवृत्तीची चर्चा, वाचा सविस्तर…

लोकेश राहुलला वगळल्याने रोहित शर्मा सलामीला खेळणार हे पक्के झाले आहे. टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही रोहित शर्माला कसोटीमध्ये सलामीला खेळण्याची संधी देण्यात येईल हे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आफ्रिकेविरुद्ध निवड झालेल्या संघात तीन वेगवान गोलंदाज, तीन फिरकीपटू, दोन यष्टीरक्षकांना स्थान मिळाले आहे.

गिलचे पदार्पण
राहुलच्या जागी शुभमन गिलला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. ‘हिंदुस्थान-अ’ संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केल्याचे बक्षिस त्याला मिळाले आहे. राहुलने विंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेत सुमार कामगिरी केली होती. यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 15 सदस्यांच्या संघात निवड झालेल्या गिलला मैदानात उतरण्याची संधी मिळते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सलामीची नवीन जोडी
लोकेश राहुलला वगळल्याने आफ्रिकेविरुद्ध नवीन मयांग अग्रवाल आणि रोहित शर्मा ही सलामीची जोडी दिसण्याची शक्यता आहे. तसेच शुभमन गिल हा देखील एक पर्याय संघ व्यवस्थापकांकडे असणार आहे.

हिंदुस्थानचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ऋद्धिमान सहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल.

आपली प्रतिक्रिया द्या