
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात 28 डिसेंबर, 2020 पासून मेलबर्नमध्ये ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव सहन करावा लागल्याने हिंदुस्थानचा संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. मेलबर्न कसोटीत पुनरागमन करून कसोटी मालिका बरोबरीत आणण्यासाठी हिंदुस्थानचा संघ झुंजताना दिसेल. मात्र ‘बॉक्सिंग डे’ कसोटीचा इतिहास टीम इंडियाला घाम फोडणारा आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामने खेळले आहेत. यात टीम इंडियाला 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर फक्त एका लढतीत विजय मिळवता आला आहे. तसेच 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.
2018 मध्ये मिळवला विजय
2018 ला खेळला गेलेला बॉक्सिंग डे कसोटी सामना टीम इंडियाने 137 धावांनी जिंकला होता. टीम इंडियाने पहिला डाव 7 बाद 443 धावा असा घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला 151 धावांमध्ये गारद केले. त्यानंतर टीम इंडियाने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान दिले. मात्र ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही 261 धावांमध्ये गुंडाळला गेला. या लढतीत पहिल्या डावात पुजाराने 106 आणि विराट कोहलीने 82 धावा केल्या होत्या. तर बुमराहने दोन्ही डावात मिळून 9 आणि जडेजाने 5 बळी घेतले होते.
INDvsAUS शमीच्या दुखापतीमुळे ‘या’ तीन खेळाडूंना कसोटीमध्ये पदार्पणाची संधी
पहिला सामना
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला बॉक्सिंग डे कसोटी सामना 1985 ला खेळला गेला होता. या लढतीत हिंदुस्थानचा कर्णधार कपिल देव तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅलन बॉर्डर होता. हा सामना अनिर्णित अवस्थेत सुटला होता. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 5 सामन्यात पराभूत केले.
टीम इंडियाची कसोटी
पहिल्या कसोटीत टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा करणारा कर्णधार विराट कोहली पितृत्वाची रजा घेऊन मायदेशी येत आहे. त्यामुळे टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपुढे कसोटी असणार आहे. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी यांच्यावर चांगल्या फलंदाजीचा अतिरिक्त दबाव असणार आहे.


























































