
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या शहरात कोरोना जास्त प्रमाणात पसरलाय. त्यामुळे हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यामधील ‘बॉक्सिंग डे’ म्हणून ओळखला जाणारा कसोटी सामना ऑडलेड येथे हलवण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण व्हिक्टोरियाचे डॅनियल ऍण्ड्र्यूस यावेळी म्हणाले की, ऑस्ट्रेलियन सरकार मेलबर्नमध्ये खेळ सुरू करण्यासाठी पाऊल उचलत असून बॉक्सिंग डे कसोटी व ऑस्ट्रेलियन ओपन या टेनिस ग्रॅण्डस्लॅमसाठी क्रीडाप्रेमींना स्टेडियममध्ये परवानगी देण्याचा विचारही करीत आहे. यासाठी त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलिया व टेनिस ऑस्ट्रेलिया यांच्याशीही संपर्क साधला आहे.
डॅनियल ऍण्ड्र्यूस पुढे म्हणाले, मेलबर्नमधील कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विनाकारण आम्ही रिस्क घेणार नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील पावले उचलली जाणार आहेत. त्यामुळे किती क्रीडाप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. कारण मेलबर्नमधील फुटबॉल स्पर्धेतील लढती पहिल्यांदाच ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी पुढे स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, ऑस्ट्रेलिया – न्यूझीलंडमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीला दोन लाखांपेक्षा अधिक क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती दाखवली होती. तसेच ऑस्ट्रेलियन ओपनसाठी आठ लाखांपेक्षा अधिक टेनिसप्रेमी स्टेडियममध्ये आले होते.




























































